नागपुरात दिवसा कडक ऊन, रात्री गारवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2021 01:08 AM2021-03-06T01:08:19+5:302021-03-06T01:14:24+5:30
Temprature उन्हाचा तडाखा हळूहळू वाढायला लागला आहे. नेहमीप्रमाणे विदर्भाला याची अधिकच झळ बसत असल्याचे दिसते. सर्व जिल्ह्यात तापमानात काहीअंशी चढ-उतार हाेत असले तरी पारा सामान्यापेक्षा ३ ते ५ अंशाने अधिकच आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : उन्हाचा तडाखा हळूहळू वाढायला लागला आहे. नेहमीप्रमाणे विदर्भाला याची अधिकच झळ बसत असल्याचे दिसते. सर्व जिल्ह्यात तापमानात काहीअंशी चढ-उतार हाेत असले तरी पारा सामान्यापेक्षा ३ ते ५ अंशाने अधिकच आहे. घराबाहेर पडणाऱ्यांना दिवसा कडक उन्हाचे चटके बसत आहेत, पण रात्री मात्र हलक्या थंडीची जाणीव हाेत आहे.
दरम्यान, विदर्भातील काही जिल्ह्यात गुरुवारपेक्षा शुक्रवारी तापमानात वाढ तर, काहीमध्ये घट नाेंदविण्यात आली. चंद्रपूरमध्ये ०.४ अंशाची वाढ हाेत पारा ३९.६ अंशाच्या उच्चांकावर पाेहचला आहे. येथील तापमान पाच दिवसात ४० अंशापर्यंत पाेहचण्याची शक्यता हवामान विभागाने नाेंदविली आहे. जिल्ह्यातील ब्रह्मपुरीमध्ये मात्र आज एका अंशाची घट झाली व तापमान ३८.८ वर खाली आले. नागपूरमध्ये ०.१ अंशाची वाढ हाेऊन पारा ३७.८ वर पाेहचला. अकाेल्याचे तापमान ३९.१ अंशावर कायम आहे. यवतमाळमध्ये कमाल तापमानात कालपेक्षा ३.७ अंशाची सर्वाधिक वाढ नाेंदविण्यात आली व तापमान ३८.७ अंशावर पाेहचले. वाशिममध्ये १.४ अंशाची घट हाेत पारा ३६ अंशावर खाली आला. वर्धा ०.७ अंशाने वाढत ३८.२ अंशाची नाेंद करण्यात आली. इतर जिल्ह्यामध्ये अमरावती ३७.८, बुलडाणा ३७.२, गडचिराेली ३६.४, गाेंदिया ३५.२ अंशाची नाेंद करण्यात आली.
नागपूरमध्ये दिवसा उन्हाने चिडचिड हाेत असली तरी रात्री मात्र गारव्याची जाणीव हाेते. शहरात १७.४ किमान तापमान नाेंदविण्यात आले, जे मार्चच्या पहिल्या आठवड्यात सारखे आहे. त्यापेक्षा गाेंदिया व गडचिराेलीमध्ये कमी म्हणजे १५.६ व १६.४ अंश किमान तापमान नाेंदविण्यात आले. हिवाळ्यात गाेंदियामध्येच सर्वात कमी तापमानाची नाेंद करण्यात आली हाेती. दरम्यान, वाढते तापमान लक्षात घेता शेतातील पिकांची मळणी करून धान्य सुरक्षित ठिकाणी साठविण्याचे आवाहन हवामान विभागाने शेतकऱ्यांना केले आहे.