नागपूर HSC 2018; दुकानात काम करणारा धम्मदीप मनपा शाळेत ‘टॉपर’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2018 11:05 AM2018-05-31T11:05:43+5:302018-05-31T11:06:07+5:30
कापडाच्या दुकानात काम करणारा महापालिकेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर विज्ञान उच्च माध्यमिक शाळेचा विद्यार्थी धम्मदीप धर्मपाल गौरकर याने ७६. ४६ टक्के गुण मिळवून शाळेत पहिला आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : बालपणीच वडिलांचे छत्र हरपले. आईच्या मोलमजुरीवर कुटुंबाचा उदरनिर्वाह व दोन मुलांचे शिक्षण अशी बिकट आर्थिक परिस्थिती. शिक्षणाच्या खर्च व कुटुंबाला हातभार लागावा यासाठी शाळा सुटल्यानंतर कापडाच्या दुकानात काम करणारा महापालिकेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर विज्ञान उच्च माध्यमिक शाळेचा विद्यार्थी धम्मदीप धर्मपाल गौरकर याने ७६. ४६ टक्के गुण मिळवून शाळेत पहिला आला.
शाळा सुरू होण्यापूर्वी व शाळा सुटल्यानंतर धम्मदीप सीताबर्डी येथील कापडाच्या दुकानात काम करायचा. कामावरून घरी आल्यानंतर रात्रीला अभ्यास, असा सहा महिने धम्मदीप याचा दिनक्रम होता. यातून शिक्षणाचा खर्च करता आला. थोडी फार घर खर्चालाही मदत झाली. मात्र परीक्षा जवळ आल्यानंतर दुकानात जाणे बंद के ले व अभ्यासावर भर दिला. परीक्षेत चांगले गुण मिळतील, असा विश्वास होता. मात्र शाळेतून पहिला येईल, असे वाटले नव्हते. पुढे इंजिनिअर व्हायचे असल्याचे धम्मदीप गौरकर याने सांगितले.
विशेष म्हणजे आई मोलमजुरी करीत असूनही धम्मदीपची मोठी बहीण मेयो येथे टेक्निशियनचे शिक्षण घेत आहे. घरात शिक्षणाचे वातावरण नाही. घरची आर्थिक परिस्थिती बिकट व सुविधांचा अभाव असूनही धम्मदीप याने मिळविलेले यश प्रेरणादायी आहे.