नागपूरमध्ये घरगुती वादातून पती-पत्नीने जाळून घेतले
By Admin | Published: March 10, 2017 01:42 PM2017-03-10T13:42:13+5:302017-03-10T13:42:13+5:30
रोज रोज होणा-या वादाचा भडका उडाल्यामुळे एकमेकांच्या रागावर पती-पत्नीने जाळून घेतल्याची घटना नागपूरमध्ये घडली.
>ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. १० - रोज रोज होणा-या वादाचा भडका उडाल्यामुळे एकमेकांच्या रागावर पती-पत्नीने जाळून घेतले. त्यात त्यांचा मृत्यू झाला. दर्शना (वय ३१) आणि सोनू लक्ष्मणराव नितनवरे (वय ३५) असे मृत दाम्पत्याचे नाव आहे. शेजा-याची वेळीच मदत मिळाल्यामुळे त्यांचा ९ वर्षांचा मुलगा बचावला. कोराडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुरुवारी मध्यरात्री ही थरारक घटना घडली.
कोराडीच्या सेक्टर २९ मधील श्रीकृष्ण धाम, वॉक्स कुलर परिसरात राहणा-या सोनूचे घरीच छोटेशे किराणा दुकान होते. घरी गायी आणि शेळ्याही होत्या. पत्नी दर्शना किराणा दुकान सांभाळायची तर सोनू दुधाचा व्यवसाय करायचा. घरची स्थिती चांगली असूनही सोनू दिवसभर कष्ट करायचा. मात्र, त्याला दारूचे व्यसन होते. रोजच त्याला दारू प्यायला लागत होती. तो दारू पिऊन घरी आल्यानंतर पती-पत्नीत वाद व्हायचा. नेहमीप्रमाणे गुरुवारी सकाळी सोनूने शेळ्या चरायला सोडल्या. त्याच्या घराच्या बाजुलाच रेल्वेलाईन आहे. रेल्वे रुळावरून जात असलेल्या एका शेळीला रेल्वेगाडीने चिरडले. ते पाहून सोनू दुखावला. त्या अवस्थेत त्याने दुपारीच दारू घेतली. त्यावरून पुन्हा पती-पत्नीत वाद झाला. तो कुरपतच गेला. रात्री रागाच्या भरात सोनूने पुन्हा दारू घेतली अन् त्यानंतर पती-पत्नीत कडाक्याचे भांडण झाले. रोज रोज होणारी कटकट संपविण्यासाठी सोनूने स्वत:च्या अंगावर रॉकेल टाकून पेटवून घेतले. छोटेसे घर अन् कपड्यापासून सारेच सामान घरात असल्याने घरातील साहित्य पेटले. सोनूला वाचविण्याच्या प्रयत्नात दर्शनाच्या अंगावरील कपड्यानेही पेट घेतला अन् काही वेळेतच दोघांचाही कोळसा झाला.
हसत्या खेळत्या घराची राखरांगोळी
सर्वांग पेटल्यामुळे दर्शना आणि सोनू जीवाच्या आकांताने किंकाळू लागले. ते ऐकून बाजुलाच झोपलेला त्यांचा नऊ वर्षीय शौर्य नामक मुलगा जागा झाला. त्याने आतून लावून असलेली दाराची कडी उघडली अन् जळणा-या आई वडीलांवर बादलीतील पाणी फेकून त्यांना विझविण्याचे प्रयत्न केले. आरडाओरड ऐकून शेजारी राहणारे पृथ्वीराज सोपान पाटील यांनी धाव घेतली. त्यांनीही दर्शना आणि सोनूला विझविण्याचे प्रयत्न केले. मात्र, तोपर्यंत ते गंभीर जखमी झाले होते. घरही जळाले होते. पाटील यांनी दिलेल्या माहितीवरून कोराडीच्या पोलीस उपनिरीक्षक योगिता तराळे आपल्या सहका-यांसह घटनास्थळी धावल्या. त्यांनी नितनवरे दाम्पत्याला रुग्णालयात हलविले. मात्र, डॉक्टरांनी दोघांनाही मृत घोषित केले. गुरुवारी सकाळपर्यंत नितनवरे दाम्पत्याचे घर हसते खेळते होते. नवरा बायको अन् मुलगा असे छोटे मात्र सुखी कुटुंब म्हणून त्यांच्याकडे शेजारी बघत होते. मात्र, दोघांच्याही अविवेकीपणामुळे या घराची राखरांगोळी झाली. आई वडील दोघांचाही मृत्यू झाल्याने शौर्य पोरका झाला.