एनआयटीने १२०० घरांना बजावली नोटीस, कारण काय?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2022 01:40 PM2022-01-24T13:40:38+5:302022-01-24T14:51:26+5:30
एनआयटीने भाडे तत्तावर दिलेल्या जागेवर संबंधित व्यक्तीने लेआऊट टाकून लोकांना जमिनी विकल्या. लोकांनी येथे पक्की घरेही बांधली. हे लेआऊट वाठोडा परिसरात येत असून, २० वर्षानंतर एनआयटीने कारवाईचा बडगा उगारल्याने लोकांमध्ये प्रचंड संताप आहे.
नागपूर : एनआयटीने (Nagpur Improvement Trust) लीजवर दिलेल्या जागेवर संबंधित व्यक्तीने लेआऊट टाकून लोकांना जमिनी विकल्या. त्या जमिनीवर लोकांनी पक्के घरेही बांधली. आता एनआयटीला जाग आली. लोकांनी एनआयटीच्या जागेवर अतिक्रमण केल्याचे नोटीस बजावून कारवाईचा इशारा दिला. हे लेआऊट वाठोडा परिसरात येत असून, २० वर्षानंतर एनआयटीने कारवाईचा बडगा उगारल्याने लोकांमध्ये प्रचंड संताप आहे.
मौजा वाठोडा परिसरातील खसरा क्रमांक १५७ येथे धरती माँ लोककल्याण सोसायटी व मानव शक्ती गृहनिर्माण सहकारी संस्थेने २००० साली १२०० प्लॉट लोकांना विकले. लोकांनी येथे पक्की घरेही बांधली. एनआयटी, महापालिका, महावितरणने येथील लोकांना रस्ते, पाणी, वीज, टॅक्सची सुविधा उपलब्ध करून दिली. लोकांनी लेआऊट धारकांकडे वारंवार रजिस्ट्री करण्याची मागणी केली. परंतु लेआऊट मालक शेख मेहमूद व रमेश कांबळी हे सातत्याने लोकांना टाळत आले. लोकांनी स्थानिक नगरसेवक व आमदारांकडेही वारंवार निवेदन दिले. परंतु लोकांना न्याय मिळाला नाही.
त्यानंतर अचानक १३ जानेवारी २०२२ रोजी एनआयटीचे अधिकारी व पोलीस जेसीबी घेऊन आले. त्यांनी खसरा क्रमांक १५७ मधील काही घरांचे कम्पाऊंड व घरेही तोडली. कुणालाही पूर्वसूचना न देता ही कारवाई करण्यात आल्याने लोकांनी त्यांचा विरोध केला. त्यामुळे अधिकारी परत निघून गेले. पण दुसऱ्याच दिवशी अधिकारी नोटीस घेऊन आले. लोकांची नावे विचारून नोटीस देण्याचा प्रयत्न करू लागले. लोकांनी त्यालाही विरोध केल्याने ते निघून गेले. परंतु ज्यांना नोटीस मिळाली, ते लोक घर तोडण्याच्या भीतीने धास्तीत आले आहे. कामावर न जाता वस्तीमध्ये ते ठिय्या देऊन आहे. यासंदर्भात वस्तीतील नागरिकांनी या अवैध कारवाईच्या विरोधात वाठोडा पोलिसांकडे तक्रार दिली आहे.
- वीस वर्षांपासून रेकॉर्डच नाही
तहसील कार्यालयाने तलाठ्यामार्फत जागेची नोंद ठेवणे गरजेचे आहे. लोकांनी तहसील कार्यालयातून माहिती घेतली असता, तलाठ्याने २० वर्षांपासून येथे घर असल्याचा रेकॉर्डच नोंदविले नाही. या प्रकरणात सोसायटी मालक व जे अधिकारी दोषी असेल त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी लोकांनी केली आहे.
- ही जमीन अजूनही एनआयटीने लीजवर दिली आहे. लीजचा कालावधी २०२९ पर्यंत आहे. लोकांनी येथे पक्के घरे बांधली आहे. अशात अचानक घर तोडण्याची नोटीस आल्याने लोकांमध्ये संताप आहे. त्यामुळे एनआयटीने प्रशासकीय प्रक्रिया करून लोकांना त्यांच्या मालकीचे पट्टे द्यावे.
प्रा. सचिन काळबांडे, आंदोलक