नागपुरात अॅग्रोव्हिजनचे शुक्रवारी उद्घाटन : व्हीव्हीआयपी पाहुण्यांची मांदियाळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2018 11:38 PM2018-11-22T23:38:38+5:302018-11-22T23:39:56+5:30
विदर्भातील शेतकऱ्यांना शिक्षित, प्रोत्साहित व सबल करण्याचा उद्देश डोळ्यांसमोर ठेवून सुरू करण्यात आलेल्या ‘अॅग्रोव्हिजन’ कृषी प्रदर्शनाचे आयोजन यंदा २३ ते २६ नोव्हेंबर दरम्यान करण्यात येणार आहे. यंदा प्रदर्शनाच्या आयोजनाचे दहावे वर्ष असून ‘व्हीव्हीआयपी’ पाहुण्यांची यावेळी मांदियाळी राहणार आहे. शुक्रवारी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, जहाजबांधणी व जलसंपदामंत्री नितीन गडकरी, केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांच्या उपस्थितीत उद्घाटन होईल.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : विदर्भातील शेतकऱ्यांना शिक्षित, प्रोत्साहित व सबल करण्याचा उद्देश डोळ्यांसमोर ठेवून सुरू करण्यात आलेल्या ‘अॅग्रोव्हिजन’ कृषी प्रदर्शनाचे आयोजन यंदा २३ ते २६ नोव्हेंबर दरम्यान करण्यात येणार आहे. यंदा प्रदर्शनाच्या आयोजनाचे दहावे वर्ष असून ‘व्हीव्हीआयपी’ पाहुण्यांची यावेळी मांदियाळी राहणार आहे. शुक्रवारी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, जहाजबांधणी व जलसंपदामंत्री नितीन गडकरी, केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांच्या उपस्थितीत उद्घाटन होईल.
दुपारी ३ वाजता रेशीमबाग मैदान येथे उद्घाटन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर, राज्याचे वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार, ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे हेदेखील उपस्थित राहतील. चार दिवस चालणाऱ्या या कृषी प्रदर्शनात कृषिज्ञान, तंत्रज्ञान, प्रशिक्षणाचे सीमोल्लंघन ठरणाऱ्या कार्यशाळा, राष्ट्रीय पातळीवरील उत्कृष्ट अत्याधुनिक तंत्रज्ञान सादरीकरणाची दालने, कृषीविषयक ताज्या विषयांवरील चर्चासत्र, यांचे आयोजन होईल. ‘अॅग्रोव्हिजन’मध्ये २५ हून विविध विषयांवर कार्यशाळा आयोजित करण्यात येणार आहेत. या कार्यशाळांमध्ये राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर तज्ज्ञ मार्गदर्शन करतील. उत्पादन तंत्रज्ञान, शेतीपद्धती, जोडधंदे, अत्याधुनिक तंत्रज्ञान, वायदेबाजार यासारख्या बाजार सुविधा आणि पायाभूत सुविधा यांच्यावर या कार्यशाळा आधारित असतील. या माध्यमातून शेतकऱ्यांना कृषी क्षेत्रातील बदल, अत्याधुनिक तंत्रज्ञान, पशुपालनातील संधी इत्यादींबाबत सखोल माहिती मिळेल.
येथे ३५० हून अधिक ‘स्टॉल्स’ राहणार आहेत. सोबतच ‘अॅग्रोव्हिजन’मध्ये यंदादेखील पशुप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र पशु व मत्स्यविज्ञान विद्यापीठ व पशुसंवर्धन विभागातर्फे यात सहकार्य देण्यात येणार आहे.