नागपुरात प्राप्तीकर खात्याच्या अधिकाऱ्याची बॅग लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2018 12:53 AM2018-10-26T00:53:36+5:302018-10-26T00:55:33+5:30
कारमधून बॅग लंपास करणाऱ्या अण्णा टोळीने शहरात हैदोस घातला आहे. प्राप्तीकर खात्याच्या अधिकाऱ्यासह चार जणांच्या कारमधून त्यांनी रोख आणि मौल्यवान चीजवस्तू असलेल्या बॅग लंपास केल्या. बुधवारी दुपारी २ ते ७ या पाच तासांच्या कालावधीत या घटना घडल्या. त्यामुळे सर्वत्र खळबळ निर्माण झाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कारमधून बॅग लंपास करणाऱ्या अण्णा टोळीने शहरात हैदोस घातला आहे. प्राप्तीकर खात्याच्या अधिकाऱ्यासह चार जणांच्या कारमधून त्यांनी रोख आणि मौल्यवान चीजवस्तू असलेल्या बॅग लंपास केल्या. बुधवारी दुपारी २ ते ७ या पाच तासांच्या कालावधीत या घटना घडल्या. त्यामुळे सर्वत्र खळबळ निर्माण झाली आहे.
न्यू नंदनवनमधील कीर्ती नगरात राहणारे आवेश आनंद तितरमारे (वय ३०) हे प्राप्तीकर खात्यात सहायक आयुक्त आहेत. बैठकीच्या निमित्ताने बुधवारी रात्री ७ वाजता रामदासपेठेतील हॉटेल सेंटर पॉर्इंटमध्ये ते आले होते. त्यांनी आपली बॅग समोरच्या सीटवर ठेवून चालकाला कार पार्किंगमध्ये लावण्याची सूचना केली आणि ते हॉटेलमध्ये निघून गेले. काही वेळेनंतर त्यांना कारचालकाचा फोन आला. चोरट्यांनी कारमधील बॅग लंपास केल्याचे त्याने तितरमारे यांना सांगितले. तितरमारे यांच्या बॅगमध्ये लॅपटॉप, हार्डडिस्क आणि रोख ११ हजार रुपये होते. त्यांनी सीताबर्डी पोलिसांना ही माहिती कळवली. प्राप्तीकर खात्याच्या अधिकाऱ्याची बॅग चोरीला गेल्याचे कळाल्याने पोलिसांतही खळबळ निर्माण झाली.
अशी घडली घटना
तितरमारे यांच्या कारचालकाने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, एक आरोपी त्यांच्याजवळ आला. त्याने तुमचे पैसे खाली पडले आहेत, असे म्हणून कारचालकाचे लक्ष विचलित केले. कारचालकाने खाली उतरून बघितले असता कारच्या मागच्या बाजूला १०, २० च्या नोटा पडून दिसल्या. त्या तो उचलत असताना चोरट्यांनी डाव साधला आणि तितरमारे यांची बॅग लंपास केली. सीताबर्डी पोलीस ठाण्यात याप्रकरणी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला.
घटनास्थळापासून १०० फुट अंतरावर दुपारी २ च्या सुमारास अशीच एक घटना घडली होती. डेंझिल रॉबिन फ्रान्सिस (वय ३२, बेलीश्याम रेल्वे कॉलोनी, पाचपावली) हे त्यांच्या कारमालकाला मिटिंगमध्ये सोडण्यासाठी रामदासपेठेत आले होते. त्यानंतर चालक अंजनी हॉस्पिटलच्या बाजूला कारमध्ये मोबाईलवर गेम खेळत बसला. दोन आरोपी त्याच्याजवळ आले. त्यांनी कारच्या खाली पैसे पडून आहेत, असे म्हणून कारचालकाला दार उघडण्यास भाग पाडले. चालक १०-२०च्या नोटा उचलत असताना आरोपीने कारमालकाची लॅपटॉप असलेली बॅग लंपास केली.