नागपूर-इंदूर वंदे भारत रेल्वे सुरू, रविवार सोडून रोज धावणार
By नरेश डोंगरे | Published: October 9, 2023 11:59 PM2023-10-09T23:59:47+5:302023-10-10T00:00:31+5:30
नागपूर स्थानकावर जोरदार स्वागत
लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर: बहुप्रतीक्षित इंदूर-नागपूर-इंदूर वंदे भारत ट्रेन आज दुपारी नागपुरात पोहोचली. मध्य प्रदेशातील दोन मोठ्या आणि वेगवेगळ्या जंक्शनला कनेक्ट करणारी ही दुसरी वंदे भारत ट्रेन ठरली आहे. यापूर्वी ११ महिन्यांपूर्वी नागपूर-बिलासपूर वंदे भारत सुरू झाली होती. तर, आता नागपूर-इंदूर वंदे भारत हायस्पीड ट्रेन सुरू झाल्याने प्रवाशांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे, आलिशान प्रवासाची अनुभूती देणारी आणि अत्यंत वेगात धावणारी ही ट्रेन उज्जैन मार्गे धावणार आहे. त्यामुळे महाकाल भक्तांमध्ये एक वेगळाच आनंद आहे.
उज्जैनला विश्वप्रसिद्ध महाकाल मंदिर आणि महाकाल लोक आहे. धार्मिक स्थळासोबतच हे जगप्रसिद्ध पर्यटनस्थळ आहे. त्यामुळे विदर्भासह नागपूरहून उज्जैनला जाणाऱ्या भाविकांची संख्या मोठी आहे. त्यामुळे भगवान महाकालच्या दर्शनाकरिता जाण्यासाठी नागपूरहून वंदे भारत ट्रेन सुरू करावी, अशी मागणी अनेक भक्तांनी लावून धरली होती. या संबंधाने लोकप्रतिनिधी, प्रवासी संघटनेचे पदाधिकारी आणि भाविकांनी रेल्वे प्रशासनाला वारंवार निवेदनही दिले होते.
या संबंधाने रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडेही इंदूर ते भोपाळ आणि भोपाळ ते इंदूर या वंदे भारत ट्रेनचा नागपूरपर्यंत विस्तार करण्याची मागणी करण्यात आली होती. ती मागणी मान्य करण्यात आली आणि इंदूर ते भोपाळ धावणाऱ्या वंदे भारतचा विस्तार सोमवारी, ९ ऑक्टोबरपासून करण्यात आला. तसे पत्रक रेल्वे प्रशासनाला रविवारी रात्री मिळाले. त्यानुसार नागपूर रेल्वेस्थानकाच्या प्लॅटफार्म क्रमांक ५ वर ही ट्रेन इंदूरहून उज्जैन, भोपाळ मार्गे नागपूरला सोमवारी दुपारी २:३० वाजता पोहोचली. यावेळी ट्रेनचे लोकोपायलट ए.जी. बेझलवार, धवल गणेश तेलंग आदींचे स्थानिक अधिकारी, तसेच रेल्वे प्रवासी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी गुलाब पुष्प देऊन स्वागत केले. इंदूरहून नागपूरला पोहोचलेल्या या पहिल्या वंदे भारत ट्रेनमध्ये उषा कुळकर्णी, अनघा नासेरी, विश्वेश्वर नासेरी आदी प्रवासी येथे पोहोचले. त्यांचेही यावेळी स्वागत करण्यात आले. नागपूर स्थानकावर ५० मिनिटे थांबल्यानंतर ३:२० वाजता ती नागपूर येथून रवाना झाली.
-----
रविवार सोडून रोज धावणार
नागपूरशी कनेक्ट झालेली ही दुसरी वंदे भारत ट्रेन रविवार वगळता आठवड्यातील इतर सहाही दिवस धावणार आहे. ती येथून रोज दुपारी ३:२० वाजता सुटणार आहे. रात्री ७ वाजता इटारसी, रात्री ८:४० वाजता भोपाळ, रात्री १०:५० वाजता उज्जैन आणि रात्री ११:४५ वाजता इंदूरला पोहोचणार आहे.
असे राहणार प्रवास भाडे
मार्ग : चेअरकार : एक्जिकेटीव्ह क्लास
- नागपूर इंदोर - १६०० : २९८०
- नागपूर उज्जैन : १५०० : २७८५
- नागपूर भोपाळ : १२१० : २१७०
- नागपूर ईटारसी : ८३५ : १६२०