नागपूरचे उद्योगपुरुष हरगोविंद बजाज यांचे निधन; उद्योग, व्यवसाय जगतात शोककळा
By जितेंद्र ढवळे | Published: October 14, 2023 05:44 AM2023-10-14T05:44:40+5:302023-10-14T05:49:43+5:30
हरगोविंद बजाज यांचे नागपूरसह विदर्भात औद्योगिकीकरणाला चालना देण्यात महत्त्वाचे योगदान आहे...
नागपूर : उद्योगपुरुष आणि बजाज ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजचे संस्थापक हरगोविंद गंगाबिसन बजाज यांचे शुक्रवारी रात्री निधन झाले. ते ९६ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी गायत्रीदेवी बजाज, मुलगा रोहित व सुनील बजाज, तसेच बराच मोठा आप्तपरिवार आहे. त्यांची अंत्ययात्रा शनिवार, १४ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता ‘साकेत,’ ५५, फार्मलॅण्ड, रामदासपेठ येथून निघून मोक्षधाम घाटावर जाईल. तिथे त्यांच्यावर विधीवत अंत्यसंस्कार करण्यात येतील.
हरगोविंद बजाज यांचे नागपूरसह विदर्भात औद्योगिकीकरणाला चालना देण्यात महत्त्वाचे योगदान आहे. विदर्भात उद्योगांच्या स्थापनेचे स्वप्न त्यांनी बघितले व विदर्भ इंडस्ट्रीज असोसिएशनचे संस्थापक-अध्यक्ष असताना ते कार्य पूर्ण करण्यास सामर्थ्य पणाला लावले. ते एक कुशल व्यावसायिक होते. त्यांनी विदर्भाच्या सर्वांगीण विकासासाठी निरंतर प्रयत्न केले. ते प्रमुख राष्ट्रीय प्लास्टिक संघटनेत सक्रिय होते. त्यांचे प्लास्टिक इंडस्ट्रीजमध्ये महत्त्वाचे योगदान राहिले आहे.
स्टील चेंबरचे संस्थापक सदस्य असलेल्या बजाज यांनी आपल्या नैतिक मूल्यांवर विशेष लक्ष दिले होते. ते हुंडाविरोधी होते. मुलांचे लग्न साध्या पद्धतीने करीत उपस्थित सर्वांना त्यांनी केवळ आशीर्वाद देण्याची विनंती केली. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. दोन दिवसांपूर्वीच त्यांची प्रकृती जाणून घेण्यासाठी लोकमतच्या एडिटोरियल बोर्डचे चेअरमन व माजी खासदार डॉ. विजय दर्डा यांनी त्यांची भेट घेतली होती. याप्रसंगी त्यांना बोलणे कठीण जात होते. तरीही त्यांचे हावभाव डॉ. दर्डा यांना समजत होते. त्यांच्या निधनावर डॉ. विजय दर्डा यांनी शोकसंवेदना व्यक्त केली. त्याचबरोबर विविध औद्योगिक व व्यावसायिक संघटनांनी उद्योगपुरुष हरगोविंद बजाज यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे.