नागपुरात अमित शहांऐवजी राजनाथसिंह येणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2019 11:11 PM2019-01-19T23:11:20+5:302019-01-19T23:12:17+5:30
भाजपाच्या अनुसूचित जाती मोर्चा अधिवेशनाच्या समारोपप्रसंगी रविवारी दुपारी ४ वाजता कस्तूरचंद पार्क येथे विजय संकल्प सभेचे आयोजन करण्यात आले आहे. स्वाईन फ्लू झाल्यामुळे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा हे येणार नसून केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांची प्रमुख उपस्थित राहणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : भाजपाच्या अनुसूचित जाती मोर्चा अधिवेशनाच्या समारोपप्रसंगी रविवारी दुपारी ४ वाजता कस्तूरचंद पार्क येथे विजय संकल्प सभेचे आयोजन करण्यात आले आहे. स्वाईन फ्लू झाल्यामुळे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा हे येणार नसून केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांची प्रमुख उपस्थित राहणार आहे.
या सभेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, जहाजबांधणी व जलसंपदामंत्री नितीन गडकरी, केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री थावरचंद गहलोत, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे हेदेखील उपस्थित राहतील. सभेच्या अगोदर सर्व चार हजार प्रतिनिधी दीक्षाभूमीला भेट देतील व त्यानंतर रेशीमबाग येथील हेडगेवार स्मृतिमंदिर परिसरातदेखील जातील.
दरम्यान अधिवेशनाच्या उद्घाटनप्रसंगी भाजपचे सरचिटणीस राम माधव व भूपेंद्र यादव यांनी प्रतिनिधींना २०१९ च्या निवडणुकांबाबत मार्गदर्शन केले. कॉंग्रेस आरक्षणाबाबात संभ्रम निर्माण करत आहे. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारच्या योजनांचा सर्वात जास्त लाभ अनुसूचित जातीलाच झाला आहे. केंद्र शासनांच्या योजनांचा बूथपातळीवर प्रचार-प्रसार करण्याची सूचना त्यांनी दिली. रविवारी अधिवेशनात मुख्यमंत्री मार्गदर्शन करणार आहेत.