रुग्णांच्या जीवावर उठले नागपूरचे विमा रुग्णालय!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2020 11:08 PM2020-03-13T23:08:38+5:302020-03-13T23:10:01+5:30

कोरोना विषाणूची लागण वाढत आहे. नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. यातच वातावरणात बदल झाल्याने व्हायरलचे रुग्ण मोठ्या संख्येत दिसून येत आहे. असे असताना कामगार व त्यांच्या कुटुंबीयांना आरोग्यसेवा देणाऱ्या राज्य कामगार विमा रुग्णालयात औषधांचा तुटवडा पडला आहे.

Nagpur Insurance Hospital issue | रुग्णांच्या जीवावर उठले नागपूरचे विमा रुग्णालय!

रुग्णांच्या जीवावर उठले नागपूरचे विमा रुग्णालय!

googlenewsNext
ठळक मुद्दे३० टक्केच औषधींचा साठा : सोनोग्राफीसह इतर यंत्रसामग्रीचाही अभाव

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोना विषाणूची लागण वाढत आहे. नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. यातच वातावरणात बदल झाल्याने व्हायरलचे रुग्ण मोठ्या संख्येत दिसून येत आहे. असे असताना कामगार व त्यांच्या कुटुंबीयांना आरोग्यसेवा देणाऱ्या राज्य कामगार विमा रुग्णालयात औषधांचा तुटवडा पडला आहे. केवळ ३० टक्केच औषधांचा साठा असल्याने बाह्यरुग्ण विभागात येणाऱ्यांना बाहेरून औषधी विकत घेण्याची वेळ आली आहे. साध्या तापाचेही औषधे मिळत नसल्याच्या रुग्णांच्या तक्रारी आहेत. सध्याच्या स्थितीत दहा दिवस पुरेल एवढाच औषधांचा साठा असल्याने रुग्णांच्या जीवावर हे रुग्णालय उठल्याचे बोलले जात आहे.
देशात दोन कोटी कामगार विमा योजनेचे सदस्य आहेत. महाराष्ट्रात ४१ लाख कामगार योजनेचे सदस्य आहेत, तर विदर्भात तीन लाख ३० हजार सदस्य आहेत. राज्याचा विचार केल्यास या कामगार रुग्णालयावर आश्रित एक कोटी ४२ लाख त्यांचे कुटुंब आहे. त्यांच्या आरोग्याची जबाबदारी कामगार रुग्णालयाची आहे. रुग्णालयाच्या बाह्यरुग्ण विभागात रोज ६००वर रुग्ण येतात. परंतु यातील बहुसंख्य रुग्णांना औषधे नसल्याचे लिहून देऊन बाहेरुन औषधे खरेदी करण्यास सांगितले जात आहे. यावरून औषध वितरक आणि रुग्णांमध्ये भांडणे होत आहेत, तर अनेक कामगारांकडे औषध विकत घेण्याइतपत पैसे राहत नसल्याने ते उपचारापासून वंचित राहत असल्याचे धक्कादायक वास्तव आहे. यातच रुग्णालयात सोनोग्राफीपासून ते आवश्यक यंत्रसामग्रीचा अभाव आहे. मात्र शासन याकडे लक्ष देत नसल्याने न्याय कुठे मागावा, असा प्रश्न कामगारांना पडला आहे.

हाफकिन कंपनीकडून अपुरा पुरवठा
राष्ट्रीय मजदूर काँग्रेसचे (इंटक) राष्ट्रीय सचिव मुकुंद मुळे यांनी सांगितले, राज्य शासनाने गेल्या तीन वर्षांपासून हाफकिन कंपनीकडे औषध पुरवठ्याची जबाबदार दिली आहे. परंतु अद्यापही या कंपनीकडून औषधी पुरवठा सुरळीत झालेला नाही. कामगार रुग्णालयाला विविध ४०० प्रकारांची औषधी लागतात. परंतु आतापर्यंत कधीच त्याचा पूर्णपणे पुरवठा झाला नाही. सध्यातर रुग्णालयात सुमारे ३० टक्केच औषधांचा साठा असल्याने याचा फटका रुग्णांवरील उपचारांना बसत आहे.

उपचारासाठी कामगारांच्या वेतनातून कापले जातात २१०० रुपये
कामगारांच्या वेतनातून कपात होणाऱ्या निधीतून विमा योजना चालते. केंद्र सरकारचे कर्मचारी विमा महामंडळाला एकदम सहा महिन्यांची रक्कम कामगार राज्य विमा सोसायटीला देते. प्रत्येक कामगारामागे २१०० सोसायटीला दिली जाते. यातूनच रुग्णालयाशी संबंधित अधिकारी, डॉक्टर्स, परिचारिका व कर्मचाऱ्यांचे वेतन होते. परंतु ज्यांच्याकडून पैसा मिळतो त्यांच्याच जीवावर ही सोसायटी उठली आहे, असेही मुळे यांचे म्हणणे आहे.

कामगारांना औषधांचा खर्च परडवणारा नाही
कामगारांना आधीच वेतन फार कमी असते. अनेकांना नियमानुसार वेतनही मिळत नाही. तुटपुंज्या वेतनावर कसातरी आपला संसाराचा गाडा चालवितात. त्याच अपुऱ्या वेतनातून उपचारासाठी पैसे कापले जात असल्याने कामगार रुग्णालयातून दर्जेदार उपचार मिळेल, ही अपेक्षा असते. परंतु गेल्या काही वर्षात कामगार रुग्णालयालाच उपचाराची गरज असल्याचे चित्र आहे. सध्या औषधांचा तुटवडा पडल्याने कामगारांना औषधी घेऊन येण्यास सांगितले जात आहे. यामुळे अनेक रुग्ण औषधांविना राहण्याची शक्यता आहे.
मुकुंद मुळे
राष्ट्रीय सचिव, राष्ट्रीय मजदूर काँग्रेसचे (इंटक).

Web Title: Nagpur Insurance Hospital issue

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.