नागपुरात होणार १८ हजार कोटींची गुंतवणूक
By admin | Published: May 15, 2017 02:20 AM2017-05-15T02:20:22+5:302017-05-15T02:20:22+5:30
‘स्मार्ट सिटी विथ मेट्रो’ म्हणून उदयाला येत असलेल्या नागपूरच्या विकासाचा वेग आणखी वाढण्याची चिन्हे आहेत.
अनिल अग्रवाल यांच्या ‘वेदांता’ समूहाचा पुढाकार : गडकरींच्या लंडन भेटीचे नागपूरला ‘गिफ्ट’
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ‘स्मार्ट सिटी विथ मेट्रो’ म्हणून उदयाला येत असलेल्या नागपूरच्या विकासाचा वेग आणखी वाढण्याची चिन्हे आहेत. ब्रिटनमध्ये मुख्यालय असणाऱ्या ‘वेदांता’ समूहातर्फे नागपुरातील बुटीबोरी येथे १८ हजार कोटींच्या गुंतवणुकीच्या माध्यमातून ‘एलसीडी पॅनल’ निर्मितीचा प्रकल्प सुरू करण्यात येणार आहे. केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी हे लंडन दौऱ्यावर गेले होते. त्यावेळी ‘वेदांता’ समूहाचे चेअरमन अनिल अग्रवाल यांनी गडकरींची भेट घेऊन नागपुरात गुंतवणूकीबाबत चर्चा केली असल्याची माहिती सूत्रांनी दिली. देशातील हा अशा प्रकारचा पहिलाच मोठा प्रकल्प ठरणार आहे हे विशेष.
गेल्या काही काळापासून जागतिक गुंतवणूकदारांची नागपूरकडे नजर लागली आहे. ‘वेदांता’ हा जागतिक पातळीवरील धातू व खाणक्षेत्रातील आघाडीचा समूह आहे. नितीन गडकरी लंडन दौऱ्यावर गेले असताना अनिल अग्रवाल यांनी त्यांची भेट घेतली. आपल्याला नागपुरात २५ हजार कोटींची गुंतवणूक करायची असून सुरुवातीला ‘इलेक्ट्रॉनिक्स स्क्रीन’ निर्मितीचा प्रकल्प सुरू करायचा आहे. यासाठी १८ हजार कोटींची गुंतवणूक करण्याची तयारी असल्याचे अग्रवाल यांनी गडकरी यांना सांगितले. गडकरी यांनीदेखील बुटीबोरीत जागा उपलब्ध असून यासंदर्भात शासनातर्फे सहकार्य करण्यात येईल, असे सांगितले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पुढील महिन्यात अनिल अग्रवाल नागपुरात येणार असून यावेळी ते जागेची पाहणी करतील. या भेटीतच गडकरी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत करारदेखील होणार आहे.
‘वेदांता’च्या ‘टीम’ने केली आहे पाहणी
या प्रकल्पासाठी ‘वेदांता’ समूहाची अनेक महिन्यांपासून तयारी सुरू आहे. समूहाच्या पथकाने मिहान व बुटीबोरीला भेट दिली होती. या प्रकल्पासाठी २०० एकरहून अधिक जागा लागणार आहे.
विदर्भातील ‘टंगस्टन’ खाणींमध्ये रस
नागपूरप्रमाणे विदर्भातदेखील अग्रवाल यांना गुंतवणुकीला वाव असल्याचे गडकरी यांनी या भेटीत सांगितले. नागपुरात ‘टंगस्टन’च्या काही खाणी बंद पडल्या असून भूगर्भशास्त्र व खनिकर्म संचालनालयानुसार नागपूर जिल्ह्यातील कुही, खोबना, आगरगाव, रानबोडी, कोलारी-भोवरी इत्यादी भागांत ‘टंगस्टन’ धातूपाषाणाचा मुबलक साठा आहे.अनिल अग्रवाल यांनी या खाणींमध्ये रस दाखविला आहे.