उपराजधानी बनतेय ‘ड्रग्ज सेंटर’; वर्षभरात चार कोटींहून अधिकचा माल जप्त

By योगेश पांडे | Published: February 27, 2023 11:54 AM2023-02-27T11:54:17+5:302023-02-27T11:54:50+5:30

‘एनडीपीएस’अंतर्गत अटक होणाऱ्यांत वाढ

Nagpur is becoming the 'drugs' center of Central India; Goods worth more than four crore seized in a year | उपराजधानी बनतेय ‘ड्रग्ज सेंटर’; वर्षभरात चार कोटींहून अधिकचा माल जप्त

उपराजधानी बनतेय ‘ड्रग्ज सेंटर’; वर्षभरात चार कोटींहून अधिकचा माल जप्त

googlenewsNext

नागपूर : काही महिन्यांअगोदर नागपुरात गांजाचा मोठा साठा जप्त करण्यात आल्यानंतर शहरातील ‘ड्रग्ज’ रॅकेटचा मुद्दा चर्चेला आला होता. पोलिस विभागाच्या आकडेवारीवर नजर टाकली असता नागपूर हे विदर्भ व मध्य भारतातील ‘ड्रग्ज’चे केंद्र म्हणून समोर येत आहे. मागील दोन वर्षांत शहरातील दाखल गुन्ह्यांमध्ये वाढ झाली असून ‘एनडीपीएस’अंतर्गत अटक होणाऱ्यांची संख्यादेखील वाढली आहे. विशेषत: तरुणांचे ‘ड्रग्ज’ सेवन करण्याचे प्रमाण चिंता वाढविणारे ठरत आहे.

२०१६ ते २०२० या कालावधीत शहरात ‘एनडीपीएस’अंतर्गत ४९४ गुन्हे दाखल झाले होते व त्यात ७४९ आरोपींना अटक झाली होती. मात्र, २०२१ पासून ‘ड्रग्ज रॅकेट’मध्ये सहभागी असणारे किंवा अमली पदार्थ सेवन करणाऱ्यांचे प्रमाण वाढल्याचे दिसून येत आहे. पोलिसांनीदेखील कारवाईचे प्रमाण वाढविले व दोनच वर्षांत ‘एनडीपीएस’अंतर्गत ६१७ गुन्हे दाखल झाले व ८४० जणांना अटक झाली. अटक झालेल्यांमध्ये ‘ड्रग पेडलर्स’ तसेच अमली पदार्थ सेवन करणारे व विक्री करणाऱ्यांचा प्रामुख्याने समावेश आहे.

वर्षभरात ५७ टक्के जास्त माल जप्त

मागील सात वर्षांत शहरात दरवर्षी ‘एनडीपीएस’च्या प्रकरणांत जप्त मालाचा आकडा हा एक कोटी रुपयांहून अधिकच राहिला आहे. मात्र, २०२१ पासून यात वाढ झाली. २०२१ मध्ये २.६३ कोटींचा माल जप्त झाला होता, तर २०२२ मध्ये ४.१३ कोटींचा माल जप्त झाला. वर्षभरातच जप्त मालात ५७ टक्क्यांनी वाढ झाली आहे.

‘एनडीपीएस’अंतर्गत दाखल झालेले गुन्हे

वर्ष : गुन्हे : अटक

  • २०१६ : ५९ : ८०
  • २०१७ : १६३ : २५३
  • २०१८ : ८७ : १२५
  • २०१९ : ११५ : १६३
  • २०२० : ७० : १२८
  • २०२१ : ३३८ : ४४१
  • २०२२ : २७९ : ३९९

 

पानठेले, कॅफेतून ‘सप्लाय’

पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार तरुण पिढी व विद्यार्थी गुन्हेगारांकडून ‘टार्गेट’ करण्यात येतात. विशेषत: शहरातील विशिष्ट पानठेले व कॅफेच्या माध्यमातून गांजा, ब्राऊनशुगर, चरस, मेफाड्रोन यांचा पुरवठा करण्यात येतो. सदर, अंबाझरी, हिंगणा पोलिस ठाण्याच्या अंतर्गत येणारे काही विशिष्ट पानठेले व कॅफे यासाठी प्रसिद्ध आहेत. तरुण व विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचून त्यांना माल ‘सप्लाय’ करण्यात काही ‘ड्रग पेडलर्स’ जास्त सक्रिय आहेत. विशेषत: ‘एमडी’ व गांजाचा पुरवठा करणारे मोठे रॅकेट असून स्थानिक पेडलर्सला माल नेमका कुठून येतो याची अनेकदा माहितीदेखील नसते. मागील वर्षी नागपुरात पंधराशे किलोहून अधिक गांजाचा साठा जप्त करण्यात आला होता व त्यानंतर खळबळ उडाली होती.

Web Title: Nagpur is becoming the 'drugs' center of Central India; Goods worth more than four crore seized in a year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.