वारंवार नापास होतोय, इंजीनियरिंग सोडून दे...; संतापलेल्या मुलाने पालकांना संपवलं, फोनवरुन रचला बनाव
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2025 08:44 IST2025-01-02T08:41:35+5:302025-01-02T08:44:33+5:30
नागपूर दुहेरी हत्याकांडाने हादरले, मुलाने केली आई-वडिलांची हत्या

वारंवार नापास होतोय, इंजीनियरिंग सोडून दे...; संतापलेल्या मुलाने पालकांना संपवलं, फोनवरुन रचला बनाव
Nagpur Crime: राज्याची उपराजधानी पुन्हा एकदा दुहेरी हत्याकांडाने हादरली आहे. नागपूरमध्ये इंजिनियरिंगचे शिक्षण घेणाऱ्या मुलाने आपल्याच आई वडिलांची निर्घृणपणे हत्या केल्याने खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर मुलाने पोलिस व कुटुंबीयांची दिशाभूल करण्याचाही प्रयत्न केला. आपल्या आई वडिलांचा खून झाला नसून त्यांनी आत्महत्या केली असल्याचे भासवण्याचाही प्रयत्न मुलाने केला. मात्र पोलीस चौकशीत त्याने हत्येची कबुली दिली. नववर्षाच्या पहिल्याच दिवशी ही घटना उघडकीस आल्यानंतर खळबळ उडाली आहे.
वारंवार नापास होत असल्याबद्दल विचारणा केल्याने मुलाने आपल्या पालकांची हत्या केली. आरोपी उत्कर्ष डाखोळे (२५) हा इंजिनिअरिंगच्या तिसऱ्या वर्षाला असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. गेल्या दोन वर्षांपासून तो नापास होत होता. उत्कर्षच्या आई-वडिलांची इच्छा होती की त्याने अभियांत्रिकी सोडून दुसरे काहीतरी करावे. याचा राग आल्याने आरोपीने २६ डिसेंबर रोजी तिचा गळा आवळून खून केला. सायंकाळी वडील घरी आल्यावर उत्कर्षने भोसकून त्यांचा खून केला. दुर्गंधी आल्यानंतर शेजाऱ्यांनी १ जानेवारीला पोलिसांना माहिती दिली, त्यानंतर संपूर्ण प्रकरण उघडकीस आले. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
आई-वडिलांचा खून केल्यानंतर आरोपी बहिणीला घेऊन मामाच्या घरी गेला. उत्कर्षने त्यांना सांगितले की, आई वडीला एका कार्यक्रमासाठी बंगळुरूला गेले आहेत. बहिणीलाही या हत्याकांडाची माहिती नव्हती. उत्कर्षही तिथेच थांबला, नंतर पोलिसांनी त्याला तिथेच अटक केली. आरोपीचे वडील लीलाधर डाखोळे हे कोराडी पॉवर स्टेशनमध्ये तंत्रज्ञ होते, तर आई अरुणा डाखोळे संगीता विद्यालयात शिक्षिका होत्या.
सहा दिवसांनी हत्येचा उलघडा
आरोपी उत्कर्ष सहा वर्षांपासून इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत होता. मात्र तो सातत्याने अपयशी ठरत होता. त्याचे आई-वडील त्याला शिक्षण सोडून शेती करायला सांगत होते. पण उत्कर्ष अभियांत्रिकी पूर्ण करण्याच्या निर्णयावर ठाम होता. उत्कर्षला एमडी ड्रग्जचे व्यसन आहे. या व्यसनामुळे त्याचे अभ्यासात लक्ष नव्हते. त्याच्या आई-वडिलांच्या सततच्या टोमणेने तो त्रस्त झाला आणि रागाच्या भरात त्याने त्यांची हत्या करण्याचा निर्णय घेतला. २६ डिसेंबर रोजी सकाळी उत्कर्ष त्याची धाकट्या बहिणीला कॉलेजमध्ये सोडण्यासाठी गेला होता.
बहिणीला सांगितले खोटं
बहिणीला कॉलेजमध्ये सोडल्यानंतर उत्कर्ष घरी पोहोचला. त्यानंतर त्याने आधी १ वाजण्याच्या सुमारास त्याची आई अरुणा हिचा गळा आवळून खून केला. यानंतर आरोपी उत्कर्ष आपल्या वडिलांच्या घरी येण्याची वाट पाहू लागला. सायंकाळी ड्युटीवरून वडील घरी पोहोचल्यावर त्याने धारदार चाकूने वार करून वडिलांचा खून केला. हत्येनंतर आरोपीने घराला कुलूप लावून वडिलांची कार आणि मोबाईल फोन घेऊन कोराडी येथे राहणाऱ्या मामाकडे नेला. तेथून त्याने आपल्या बहिणीला फोन केला आणि तिला खोटे सांगितले की त्याचे आई-वडील काही दिवसांसाठी ध्यानासाठी बंगळुरूला गेले आहेत आणि तिथे त्यांना त्यांचा मोबाइल फोन बंद करावा ठेवावा लागणार आहे.
वडिलांच्या मोबाईल टाईप केली 'सुसाईड नोट'
हत्येचे रहस्य उलगडू नये म्हणून त्याने आपल्या बहिणीला वडिलांच्या गाडीतून कॉलेजमध्ये सोडण्यास सुरुवात केली आणि ते मामाच्या घरी राहिले. मात्र, दिखावा करण्यासाठी उत्कर्ष मंगळवारी रात्री त्यांच्या घरी आला आणि त्याने जोरात दरवाजा ठोठावण्याचा बहाणा केला. यानंतर तो पुन्हा मामाकडे गेला. ही आत्महत्या वाटावी म्हणून त्याने वडिलांच्या मोबाईलवर 'सुसाईड नोट' टाईप केली. त्याचा स्क्रीन शॉट घेतला आणि तो फोटो वडिलांच्या मोबाईलमध्ये स्किन सेव्हर म्हणून ठेवला. त्यामध्ये 'आमच्या आत्महत्येला कोणीही जबाबदार नाही, मुलांना त्रास देऊ नका, आमच्या मृतदेहाचे पोस्टमॉर्टमही करू नका, आम्हाला थेट स्मशानभूमीत घेऊन जा,' असं लिहीलं होतं.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तपास सुरु केला. पोलिसांनी उत्कर्षला ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता त्याने आई-वडिलांची हत्या केल्याची कबुली दिली. त्याने पोलिसांना सांगितले की, तो इतका संतापला होता की त्याने आपल्या वडिलांना नेमके किती वार केले हे आठवत नाही. पोलिसांनी उत्कर्षला अटक केली असून अधिक तपास करत आहेत.