अमली पदार्थांच्या तस्करीसाठी नागपूर मार्ग ‘हॉट स्पॉट’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2022 08:00 AM2022-11-19T08:00:00+5:302022-11-19T08:00:02+5:30
Nagpur News तस्करांसाठी अमली पदार्थांच्या तस्करीसाठी नागपूर मार्ग ‘हॉट स्पॉट’ झाला आहे. विशेषत: ओडिशा येथील मलकानगिरी येथून मोठ्या प्रमाणावर खेप पाठविण्यात येते.
योगेश पांडे
नागपूर : नागपुरात पंधराशे किलोहून अधिक गांजा जप्त झाल्यानंतर नागपूर पोलिसांची ‘ऑपरेशन नार्को फ्लशआऊट’ ही मोहीम आणखी सक्रिय झाली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ओडिशातून उत्तरेकडील व पश्चिमेकडील राज्यांमध्ये नागपूरमार्गेच गांजा तस्करी करण्यावर भर देण्यात येतो. तस्करांसाठी अमली पदार्थांच्या तस्करीसाठी नागपूर मार्ग ‘हॉट स्पॉट’ झाला आहे. विशेषत: ओडिशा येथील मलकानगिरी येथून मोठ्या प्रमाणावर खेप पाठविण्यात येते.
नागपूर पोलिसांकडून हीच बाब लक्षात घेऊन या रॅकेटकडे लक्ष देण्यात येत होते. खुद्द पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनीच यात पुढाकार घेतला होता व त्यांच्या खबऱ्यांच्या माध्यमातूनच इतका मोठा साठा जप्त करण्यात यश आले. ओडिशा राज्यात मोठ्या प्रमाणावर गांजाचे उत्पादन होते. विशेषत: दुर्गम गावांमध्ये तर याचे पीक मोठ्या प्रमाणावर होते. विशेषत: मलकानगिरीजवळ तस्करांकडूनच जमिनी घेऊन उत्पादन करण्यात येते. अगोदर बस्तर व नक्षल प्रभावित भागातून गांजा विविध ठिकाणी पाठविण्यात येत होता. मात्र तेथे सुरक्षा वाढल्याने तस्करांनी नागपूर मार्गाला प्राधान्य दिले. हीच बाब लक्षात घेऊन आता पोलिसांनी आंतरराज्य तस्करीवर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. विशेषत: तेथील सुरक्षा यंत्रणा व एजन्सीच्या माध्यमातून ‘इनपुट’ मिळविण्यावर भर देण्यात येत आहे.
आंध्र प्रदेश, महाराष्ट्रातील तस्कर सक्रिय
मलकानगिरी व ओडिशातील गांजाची तस्करी करण्यासाठी महाराष्ट्रातील तस्कर सक्रिय असतात. मलकानगिरी व परिसरात स्वस्त दरात गांजा विकत घेऊन ते माल बाहेर काढतात. या परिसरातून निघणाऱ्या मार्गांवर हवी तशी तपासणी होत नाही. सात वर्षांपूर्वी कामानारजवळ नागपुरातील तस्करांनादेखील अटक करण्यात आली होती. अगोदर ओडिशातून छत्तीसगडमार्गे गांजा महाराष्ट्रात आणला जायचा. तस्करांकडून ट्रकऐवजी तेव्हा ट्रॅव्हल्स किंवा मोठ्या कारचा उपयोग करण्यात यायचा.
तस्करांचे मजबूत ‘सिंडिकेट’
महाराष्ट्र, मध्य प्रदेश, तेलंगणा, आंध्र प्रदेश, ओडिशा या राज्यांतील गांजा तस्करांचे एक मजबूत सिंडिकेट असल्याची माहितीदेखील सूत्रांनी दिली. ओडिशा ते दक्षिण भारत व देशाच्या इतर भागात गांजाच्या तस्करीसाठी नागपूर शहर ‘ट्रान्सिट रुट’ बनले होते. आमचे या सर्व गोष्टींवर बारीक लक्ष असून गोपनीय यंत्रणा सतर्क करण्यात आली आहे, असे पोलीस आयुक्तांनी स्पष्ट केले.