Nagpur: तुम्ही घेत असलेली मिठाई आरोग्याला अपायकारक तर नाही ना?
By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2023 09:53 PM2023-11-02T21:53:34+5:302023-11-02T21:54:59+5:30
Nagpur: तुम्ही खरेदी करीत असलेली मिठाई आरोग्याला अपायकारक आहे का, बेस्ट बिफोरचे बोर्ड तपासून मिठाई खरेदी केली का आणि अन्न व औषध प्रशासन विभागाचे अधिकारी खरंच तपासणी करतात काय, असे अनेकविध गंभीर प्रश्न दिवाळी सणाच्या निमित्ताने उपस्थित झाले आहेत.
- मोरेश्वर मानापुरे
नागपूर - दिवाळी सणात मिठाईची सर्वाधिक विक्री होते. त्याचा फायदा घेत विक्रेते दुध आणि दुग्धजन्य पदार्थांमध्ये सर्रास भेसळ करतात. त्यामुळे तुम्ही खरेदी करीत असलेली मिठाई आरोग्याला अपायकारक आहे का, बेस्ट बिफोरचे बोर्ड तपासून मिठाई खरेदी केली का आणि अन्न व औषध प्रशासन विभागाचे अधिकारी खरंच तपासणी करतात काय, असे अनेकविध गंभीर प्रश्न दिवाळी सणाच्या निमित्ताने उपस्थित झाले आहेत.
ग्राहकांना शुद्ध अन्न उपलब्ध करून देण्याची जबाबदारी अन्न व औषध प्रशासन विभागाची आहे. अपुरे अधिकारी आणि कर्मचारी असल्याचे कारण सांगून अनेकजण कार्यालयात कागदपत्रांमध्ये रमतात. वरिष्ठांनी प्रत्येक अधिकाऱ्याला कारवाईचे टारगेट देऊन तपासणीसाठी कार्यालयाबाहेर घालवावे, अशी मागणी ग्राहक पंचायतचे गजानन पांडे यांनी केली आहे.
मिठाईच्या दुकानात प्रत्येक मिठाईवर 'बेस्ट बीफोर'चा बोर्ड असणे आवश्यक आहे. बोर्ड न लावलेल्या विक्रेत्यांवर विभागाचे अधिकारी दक्षतेने कारवाई करीत नाही. आर्थिक व्यवहारामुळे कारवाई होत नसल्याने विक्रेत्यांमध्ये अधिकाऱ्यांची भीती राहिली नाही. ह्यबेस्ट बीफोरह्णचे बोर्ड असो वा मिठाईच्या दुकानात नियमांप्रमाणे ठेवली जाणारी स्वच्छता, ती बाब अंतर्भूत नसल्याने आवडीपोटी खाल्ली जाणारी मिठाई ही आरोग्यासाठी अपायकारक आहे. नागरिकांनी दिवाळीमध्ये मिठाई खरेदी करतांना बेस्ट बीफोरचे बोर्ड आहे की नाही, याची खात्री करावी. जर बेस्ट बीफोरच्या तारखेनंतरही संबधित दुकानदार ती मिठाई विकत असेल तर त्या संदर्भात एक जागरूक नागरिक म्हणून अन्न व औषध प्रशासनाकडे तातडीने तक्रार करणे गरजेचे आहे.
शिळ्या मिठाईमुळे विषबाधेची शक्यता
शिळ्या मिठाईमुळे विषबाधेची शक्यता जास्त असते. मिठाई विक्रेत्यांची तपासणी करण्यात येत असल्याचा अधिकाऱ्यांचा दावा आहे. पण किती विक्रेत्यांवर कारवाई केली, याचा डाटा विभागाकडे उपलब्ध नाही. नियमांचे उल्लंघन न करणाऱ्या दुकानदारांवर दंडात्मक कारवाई करावी, अशी नागरिकांची मागणी आहे.
शहरात मिठाईची एक हजार दुकाने
सध्या नागपुरात मिठाईची १ हजार दुकाने असल्याचा अंदाज आहे. त्या तुलनेत अधिकाऱ्यांची संख्या कमी असल्याचा वरिष्ठांचा दावा आहे. त्यामुळे सर्व दुकानांची तपासणी करणे अधिकाऱ्यांना शक्य होत नाही. याच कारणानी बऱ्याच दुकानातून शिळी मिठाई विकली जात असल्याची शक्यता नाकारता येत नाही.
दिवाळीत अन्न विक्रेत्यांकडून भेसळ केली जाते, ही बाब काही अंशी खरी आहे. प्रत्येक दुकानावर अन्न व औषध प्रशासन विभागाचे लक्ष आहे. सणांमध्ये तपासणी मोहीम राबविण्यात येत आहे.
अन्न सुरक्षा अधिकारी.