नागपुरात प्रेयसीसोबत सलगी साधणाऱ्या मित्राला भोसकले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2018 10:34 PM2018-03-20T22:34:05+5:302018-03-20T22:34:15+5:30
आपल्या प्रेयसीवर डोळा ठेवून तिच्याशी सलगी साधत असल्याच्या संशयावरून एका तरुणावर त्याच्या दोन मित्रांनी जीवघेणा हल्ला चढवला. नंदनवनमधील हिवरीनगरात सोमवारी रात्री ८.४५ च्या सुमारास ही घटना घडली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : आपल्या प्रेयसीवर डोळा ठेवून तिच्याशी सलगी साधत असल्याच्या संशयावरून एका तरुणावर त्याच्या दोन मित्रांनी जीवघेणा हल्ला चढवला. नंदनवनमधील हिवरीनगरात सोमवारी रात्री ८.४५ च्या सुमारास ही घटना घडली. जखमी तरुणाचे नाव सूरज किशोर खानोरकर (वय २७) असून, तो त्रिमूर्तीनगरात राहतो.
सूरज नंदनवनमध्ये एका दुकानात काम करतो. आरोपी निशांत भाकरे आणि कमलेश अलोणे (दोघेही रा. पारडी राममंदिराजवळ) हे त्याचे मित्रच आहेत. निशांतचे एका तरुणीसोबत अनेक दिवसांपासून प्रेमसंबंध आहे. काही दिवसांपासून सूरजने तिच्याशी सलगी साधण्याचे प्रयत्न चालवले. तिला फोन, मेसेज करण्याचा प्रकार सुरू केल्याचे निशांतच्या लक्षात आले. त्यामुळे सूरजला त्याने जाब विचारला. त्याने नकार दिल्याने काही दिवसांपूर्वी या संबंधाने प्रेयसी, निशांत, कमलेश आणि सूरजची बैठक झाली. त्यात सूरजने यापुढे आपण ‘तिला’ फोन मेसेज करणार नाही, असे सांगितले. मात्र, त्याने फोन आणि मेसेज करण्याचा प्रकार सुरूच ठेवल्याचा संशय आल्याने आरोपी निशांत भाकरे आणि कमलेशने सूरजला धडा शिकविण्याचा कट रचला.
सोमवारी रात्री दुकान बंद करून सूरज नंदनवनमधून आपल्या घराकडे निघाला होता. आरोपी निशांत आणि कमलेश यांनी दुचाकीवर (एमएच ४९/ डब्ल्यू ३७३०) येऊन हिवरीनगरातील शिवाजी सोसायटीत सूरजला थांबवले. ‘तुझे प्रणाली सोबत काय प्रकरण सुरू आहे’, अशी विचारणा केली. सूरजने आपले काहीही संबंध नाही, असे सांगितले. मात्र, आरोपींचे समाधान झाले नाही. त्यामुळे त्यांनी सूरजसोबत वाद घातला. त्यानंतर आरोपी निशांतने त्याच्या खिशातून मिरची पूड बाहेर काढून ती सूरजच्या तोंडावर फेकली तर आरोपी कमलेशने चाकूने पोटावर, छातीवर वार करून सूरजला गंभीर जखमी केले. आरडओरड केल्याने सूरजच्या मदतीला बाजूची मंडळी धावली. ते पाहून आरोपी पळून गेले. गंभीर जखमी झालेल्या सूरजला डॉक्टरकडे नेण्यात आले. उपचारानंतर त्याने नंदनवन पोलिसांना दिलेल्या बयानवजा तक्रारीवरून नंदनवनचे सहायक उपनिरीक्षक सलिम बेग यांनी आरोपींविरुध्द गुन्हा नोंदविला.
आरोपी गजाआड
पोलिसांनी आरोपींच्या शोधासाठी धावपळ सुरू केली आणि दोघांनाही अटक केली. सूरजने मैत्रीत दगाबाजी केल्याने त्याला आपण धडा शिकविल्याचे आरोपी सांगत आहेत. पोलीस पुढील चौकशी करीत आहेत.