कारागृहाचे ‘मोबाईल कनेक्शन’ उघड; 'त्या' पीएसआयनेच बोलविल्या बॅटरीज्, दोन कर्मचारी निलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2022 01:10 PM2022-09-07T13:10:45+5:302022-09-07T13:11:15+5:30

तुरुंगात गांजा-मोबाईल बॅटरी नेण्याच्या प्रकरणात सहाजणांना अटक

Nagpur Jail 'mobile connection' exposed; Batteries ordered by suspended PSI itself, two police employees suspended | कारागृहाचे ‘मोबाईल कनेक्शन’ उघड; 'त्या' पीएसआयनेच बोलविल्या बॅटरीज्, दोन कर्मचारी निलंबित

कारागृहाचे ‘मोबाईल कनेक्शन’ उघड; 'त्या' पीएसआयनेच बोलविल्या बॅटरीज्, दोन कर्मचारी निलंबित

googlenewsNext

नागपूर : मोक्काच्या आरोपी कारागृहात गांजा आणि मोबाईलची बॅटरीज् घेऊन जाताना आढळल्याने पोलीस प्रशासनात खळबळ उडाली आहे. या प्रकरणात सहभागी असलेल्या सहाजणांना अटक करण्यात आली आहे. आश्चर्याची बाब म्हणजे यात एक निलंबित पोलीस उपनिरीक्षक सूत्रधार असून त्यानेच मोबाईल-गांजा आणण्यासाठी आरोपीच्या भावाला पैसे दिले होते. या प्रकरणात हलगर्जी दाखविल्यामुळे दोन पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले असून सखोल चौकशी सुरू आहे, अशी माहिती पोलीस आय़ुक्त अमितेश कुमार यांनी दिली आहे.

खापरखेडा येथे राहणारा सूरज कावळे (वय २२) या कुख्यात गुन्हेगाराची सोमवारी न्यायालयात हजेरी होती. शहर पोलिसांच्या कर्मचाऱ्यांनी सूरजला कारागृहातून मोक्का न्यायालयात नेले. तेथील कार्यवाही संपल्यानंतर त्याला तुरुंगात आणण्यात आले. दुपारी अडीच वाजता पोलीस कर्मचारी सूरजला घेऊन कारागृहाच्या मुख्य प्रवेशद्वारावर पोहोचले. सूरजकडे कागदपत्रांच्या फायली होत्या. त्यांची तपासणी केली असता त्यात ५१ ग्रॅम गांजा आणि १५ मोबाईल बॅटरी लपवून ठेवल्या होत्या. यानंतर पोलीस व कारागृह प्रशासनात खळबळ उडाली.

कैद्याकडून गांजा, मोबाइल बॅटरी तुरुंगात नेण्याचा प्रयत्न; झडतीत कारागृह रक्षकांनी पकडले

गुन्हे शाखा, डीबी स्क्वॉड, खबऱ्यांचे नेटवर्क इत्यादींच्या माध्यमातून पोलिसांनी गांजा पुरविणाऱ्या मोरेश्वर सोनावणे या तस्कराला ताब्यात घेतले. तसेच अथर्व खटाखटी, मुकेश नायडू, शुभम कावळे, भागीरथ थारदयाल, सूरज वाघमारे यांना अटक केली. त्यांची चौकशी केली असता खळबळजनक खुलासा समोर आला. कारागृहात असलेला निलंबित पोलीस उपनिरीक्षक प्रदीप नितवणे याने शुभमला ४५ हजार रुपये दिले होते व गांजा तसेच मोबाईलच्या बॅटरींची व्यवस्था करण्यास सांगितले होते. त्यातूनच त्याने सूरजचा भाऊ शुभमला मोबाईलसाठी बॅटरींची व्यवस्था करण्यास सांगितले. सातही आरोपींविरोधात प्रिझनर्स ॲक्टअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

निलंबित पीएसआयच्या भावाने केले पैसे ट्रान्सफर

नितवणे गडचिरोली पोलीस तैनात होता व त्याची एएनओमध्ये नियुक्ती झाली होती. तीन महिन्यांपूर्वी अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी अटक झाल्यानंतर तो तुरुंगात आहे. तो तुरुंगात गेल्यापासून मोबाईल वापरत होता. मित्र, नातेवाईक यांच्याशिवाय इतर लोकांशीही तो बोलत असे. नितवणेला सूरजच्या बॅरेकमध्ये ठेवण्यात आले आहे. त्यामुळे दोघांमध्ये मैत्री झाली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नितवणेचा भाऊ सचिन हादेखील पोलीस आहे. काही दिवसांपूर्वी नितवणेने त्याच्या भावाला तहसील पोलीस ठाण्यात फोन करून ४५ हजार रुपये मोक्का गुन्हेगाराच्या खात्यात ट्रान्सफर करण्यास सांगितले. सचिनने पैसे ट्रान्सफर केल्यानंतर सूरजचा भाऊ शुभम आणि त्याचे अन्य साथीदार गांजा आणि मोबाईलच्या बॅटरीच्या विकत घेण्यासाठी कामाला लागले.

मोबाईल्ससाठी नागपूर मध्यवर्ती कारागृहात पोलिसांचं सर्वात मोठं ‘सर्च ऑपरेशन’

१५ बॅटऱ्यांसाठी ४५ हजार कसे ?

सर्वसाधारणत: मोबाईल फोनच्या बॅटरीची किंमत पाचशे ते पंधराशे रुपयापर्यंत असते. अशा स्थितीत प्रदीप नितवणे याने शुभमला ४५ हजार रुपये दिल्याने अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. यानंतरदेखील मोबाईलच्या बॅटरींची खेप येणार होती का तसेच याअगोदरदेखील अशा पद्धतीने पुरवठा झाला का यादृष्टीने पोलीस तपास करत आहेत. एनडीपीएस सेल, गुन्हे शाखा या प्रकरणाचा तपास करत आहेत.

त्या कर्मचाऱ्यांचा सहभाग नाही

दरम्यान, सूरजसोबत न्यायालयात असलेल्या हवालदार प्रकाश मुसळे आणि हेमराज राऊत यांना निलंबित करण्यात आले, तर अन्य तिघांची विभागीय चौकशी सुरू करण्यात आली आहे. त्यांच्या हलगर्जीसाठी ही कारवाई झाली आहे. त्यांचा या प्रकरणात इतर कुठलाही सहभाग नसल्याचे प्रथमदर्शनी समोर आले आहे. मात्र, तरीदेखील त्यांची सखोल चौकशी सुरू आहे.

Web Title: Nagpur Jail 'mobile connection' exposed; Batteries ordered by suspended PSI itself, two police employees suspended

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.