नागपुरात जनमंचने बुजवले जीवघेणे खड्डे : जीवनरक्षणासाठी पुढाकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2019 09:31 PM2019-05-06T21:31:06+5:302019-05-06T21:32:34+5:30

नेहमीच समाजोपयोगी कार्य करणाऱ्या जनमंच संस्थेने सोमवारी शहरातील जीवघेणे खड्डे बुजविण्याची मोहीम राबविली. दिवसभरात विविध ठिकाणचे ३० वर खड्डे सिमेंट काँक्रिट टाकून बुजवण्यात आले.

In Nagpur Janmanch filled up fatal pits : Initiatives for life saving | नागपुरात जनमंचने बुजवले जीवघेणे खड्डे : जीवनरक्षणासाठी पुढाकार

नागपुरात जनमंचने बुजवले जीवघेणे खड्डे : जीवनरक्षणासाठी पुढाकार

Next
ठळक मुद्दे महापालिकेपुढे ठेवला तत्परतेने काम करण्याचा आदर्श

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नेहमीच समाजोपयोगी कार्य करणाऱ्या जनमंच संस्थेने सोमवारी शहरातील जीवघेणे खड्डे बुजविण्याची मोहीम राबविली. दिवसभरात विविध ठिकाणचे ३० वर खड्डे सिमेंट काँक्रिट टाकून बुजवण्यात आले.
गत ३० मार्च रोजी वाहतूक विभागाने शहरातील जीवघेण्या खड्ड्यांची यादी जाहीर केली होती. त्यानंतर महापालिकेने तातडीने पावले उचलून खड्डे बुजवणे गरजेचे होते, परंतु तसे झाले नाही. त्यामुळे जनमंचनेच पुढाकार घेतला व जीवनरक्षणासाठी तातडीने हालचाली करणे किती आवश्यक असते, याचा आदर्श महापालिकेपुढे ठेवला. या मोहिमेला इंदोरा चौकातून सुरुवात करण्यात आली. इंदोरा चौकातील जसवंत टॉकीजपुढचा पहिला मोठा खड्डा सिमेंट काँक्रिट टाकून बुजविण्यात आला. त्यानंतर गुरूनानकपुरा, पागलखाना चौक, कल्पना टॉकीज परिसर, मोहिनी कॉम्प्लेक्स, मोक्षधाम, टेलिफोन एक्सचेंज चौक, पारडी, जुना भंडारा रोड, ग्रेट नाग रोड, गणेशपेठ बसस्थानक इत्यादी ठिकाणचे खड्डे बुजविण्यात आले. खड्ड्यांमध्ये भरलेल्या सिमेंट काँक्रिटवर पाणी टाकण्याची व आवश्यक देखभाल करण्याची जबाबदारी परिसरातील व्यक्तींवर सोपविण्यात आली. सिमेंट काँक्रिटवर पाण्याचा ओलावा राहण्यासाठी संबंधितांना पोती देण्यात आली. या मोहिमेत जनमंचचे अध्यक्ष प्रमोद पांडे, उपाध्यक्ष राजीव जगताप, महासचिव नरेश क्षीरसागर, कोषाध्यक्ष प्रल्हाद खरसने, सदस्य श्रीकांत दोड, राम आखरे, श्रीकांत देवळे, प्रकाश गौरकर, विनोद बोरकुटे, बाबा राठोड, श्रीधर उगले, टी. बी. जगताप, उत्तम सुळके, सुहास खांडेकर, आशुतोष दाभोळकर आदी सहभागी झाले होते. मोहिमेच्या यशस्वीतेसाठी वाहतूक पोलिसांनी सहकार्य केले.
मनपाला निवेदन देणार
जीवघेण्या खड्ड्यांची यादी जाहीर झाल्यानंतर महापालिकेने तातडीने हालचाली करून खड्डे बुजविणे गरजेचे होते. परंतु त्यांनी उदासीनता दाखविली. त्यामुळे जनमंचनेच पुढाकार घेतला. दिवसभरात शक्य झाले तेवढे खड्डे आम्ही बुजविले. आता पुढचे काम मनपाने करावे, याकरिता त्यांना निवेदन सादर करण्यात येईल. त्याकडे दुर्लक्ष केले गेल्यास जनमंच पुन्हा आंदोलन करेल.
 प्रमोद पांडे

खड्डे बुजविणे गरजेचे
जीवघेणे खड्डे संपूर्ण शहरभर आहेत. परंतु मनपा प्रशासनासह नगरसेवकांनाही त्याचे काहीच गांभीर्य नाही. खड्ड्यांमुळे रोज अपघात होत आहेत. वाहनचालक गंभीर जखमी होत आहेत. कधीही कुणाचेही प्राण हिरावले जाऊ शकतात, अशी परिस्थिती आहे. परिणामी, जनमंचची ही मोहीम महापालिकेने पुढे न्यावी.
राजीव जगताप व नरेश क्षीरसागर

Web Title: In Nagpur Janmanch filled up fatal pits : Initiatives for life saving

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.