Nagpur: आताच रस्ता गुळगुळीत केला अन् आता पुन्हा खोदला, नागरिकांना त्रास, प्रचंड रोष
By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2023 07:45 PM2023-03-26T19:45:20+5:302023-03-26T19:48:05+5:30
Nagpur: जी २० (सी २०)च्या निमित्ताने उपराजधानीचा नुकताच मेकओव्हर करण्यात आला. रस्ते गुळगुळीत करण्यात आले अन् दुतर्फा साैंदर्यीकरणही करण्यात आले. मात्र, सी २०चे पाहुणे नागपुरातून परत जाताच जागोजागी खोदकाम सुरू झाले.
- नरेश डोंगरे
नागपूर - जी २० (सी २०)च्या निमित्ताने उपराजधानीचा नुकताच मेकओव्हर करण्यात आला. रस्ते गुळगुळीत करण्यात आले अन् दुतर्फा साैंदर्यीकरणही करण्यात आले. मात्र, सी २०चे पाहुणे नागपुरातून परत जाताच जागोजागी खोदकाम सुरू झाले. त्यामुळे पुन्हा काही ठिकाणी बकालपणाचा अनुभव येत असून, हा विकास आहे की पैशाची उधळण, असा संतप्त सवाल नागरिक विचारू लागले आहेत.
शहरात २० ते २२ मार्चपर्यंत सी २० परिषद पार पडली. त्यासाठी देश- विदेशातील पाहुणे नागपुरात आले. देशाचे हृदयस्थळ असलेले आंबट-गोड चवीच्या संत्र्यांचे शहर त्यासाठी स्वच्छ आणि सुंदर करण्याची तयारी महिनाभरापूर्वी सुरू झाली. अखेरच्या आठवड्यात तर रात्रंदिवस करून जागोजागी हिरवळ, कारंजी निर्माण करण्यात आली. रस्ते स्वच्छ अन् गुळगुळीत करण्यात आले. दोन्ही बाजूला छान झाडे, नेत्रदीपक रोषणाई लावण्यात आली. पाहुणे विमानतळावरून येणार-जाणार तसेच काही विशिष्ट भागात सफर करणार, याचा अंदाज असल्याने वर्धा मार्ग, सिव्हिल लाइनवर खास नजर रोखण्यात आली. संविधान चाैक विमानतळ असा वर्धा रोड कमालीचा देखणा करण्यात आला.
उपराजधानीच नव्हे तर बाहेरून येणारी मंडळीही हा नवा लूक बघून ऑरेंज सिटीच्या प्रेमात पडली. वर्धा मार्गाच्या खास साैंदर्यीकरणाची कर्णोपकर्णी अशी काही चर्चा झाली की २१ मार्चपासून शहरातील रात्रीचे ट्रॅफिक अचानक वाढले. प्रचंड संख्येत नागरिक वर्धा मार्गावरील रोषणाई, आकर्षक देखावे आणि सुशोभीकरण बघण्यासाठी पहाटेपर्यंत गर्दी करू लागली. मात्र, सी २० संपली. पाहुणे रवाना झाले अन् आता तीन- चारच दिवसांनी काही ठिकाणी खोदकाम पुन्हा सुरू झाले. वर्धा मार्गावरील जेल रोड मेट्रो स्टेशन चाैक ते रहाटे चाैकाचा मार्ग पुन्हा खोदून काढून अरुंद करण्यात आला. दोन आठवड्यांपूर्वीच गुळगुळीत केलेला हा मार्ग खोदून आता तो नव्याने बनविण्याचे काम सुरू झाल्याने अनेकांच्या माथ्यावर वळ्या पडल्या आहेत.