दोन दिवसात एक हजाराने वाढली तूर! दररोज हजार पोत्यांची आवक
By मोरेश्वर मानापुरे | Published: May 26, 2024 08:48 PM2024-05-26T20:48:25+5:302024-05-26T20:50:09+5:30
कळमना धान्य बाजारात हरभरा ५००, तर गव्हात १०० रुपयांची वाढ
नागपूर : तूरीसोबत तूर डाळीच्या किमतीतही वाढ होत आहे. कळमना धान्य बाजारात केवळ दोनच दिवसात तूर डाळीचे भाव एक हजार, हरभरा ५०० रुपये आणि मिल क्वालिटी गव्हाचे भाव प्रति क्विंटल १०० रुपयांनी वाढले आहेत. भाववाढीसाठी यावर्षी उत्पादन कमी असल्याचे कारण सांगितले जात आहे.
कळमन्यात शनिवारी एक हजाराच्या दरवाढीसह तूरीचे ११,५०० ते १२,९५० रुपये प्रति क्विंटल भावाने सौदे झाले. दररोज एक हजार पोत्यांची आवक आहे. याशिवाय हरभऱ्यात प्रति क्विंटल ५०० रुपयांची वाढ झाली असून भाव दर्जानुसार ६,५०० ते ६,९०० रुपये आहेत. दररोज २ हजार पोत्यांची आवक आहे. गव्हाच्या भावातही तेजी दिसून आली. मिल क्वालिटीचे भाव प्रति क्विंटल १०० रुपयांनी वाढून २,४०० ते २,६०० रुपयांवर पोहोचले. दररोज हजार पोत्यांची आवक असल्याचे धान्य बाजार असोसिएशनचे पदाधिकारी कमलाकर घाटोळे यांनी सांगितले.
घाटोळे म्हणाले, जानेवारी महिन्यात अर्थात हंगामाच्या सुरुवातीला तूर ८ हजार रुपयांपासून, फेब्रुवारीत हरभरा ५,५०० रुपये आणि मार्च महिन्यात गव्हाची २,२०० ते २,३०० रुपयांदरम्यान विक्री झाली. पुढे भाव किती वाढतील, हे पुरवठ्यावर अवलंबून राहील.