नागपूरच्या कळमना भागात विद्यार्थिनीला भरधाव ट्रेलरने चिरडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2017 12:53 PM2017-12-05T12:53:12+5:302017-12-05T12:55:30+5:30
शाळेत निघालेल्या एका सायकलस्वार विद्यार्थिनीला भरधाव ट्रकट्रेलरने चिरडले. कळमना परिसरात सोमवारी सकाळी ११.३० च्या सुमारास हा भीषण अपघात घडला.
आॅनलाईन लोकमत
नागपूर : शाळेत निघालेल्या एका सायकलस्वार विद्यार्थिनीला भरधाव ट्रकट्रेलरने चिरडले. कळमना परिसरात सोमवारी सकाळी ११.३० च्या सुमारास हा भीषण अपघात घडला. भारती अरुण वनवासे (वय १५) असे मृत विद्यार्थिनीचे नाव असून, ती चिखली कळमन्यातील म्हाडा कॉलनीत राहात होती.
भारतनगरातील राम मनोहर लोहिया शाळेची दहावीची विद्यार्थिनी असलेली भारती नेहमीप्रमाणे शाळेत जायला सोमवारी सायकलने निघाली. सकाळी ११.३० च्या सुमारास ती गोमती शाळेजवळून जात होती. सिमेंट रस्त्याचे काम सुरू असल्याने हा मार्ग एकतर्फी करण्यात आला आहे. जागोजागी मातीचे ढिगारेही आहेत. रस्त्याच्या काठाने मार्ग काढत जात असलेल्या भारतीची सायकल घसरल्याने ती खाली पडली. त्याचवेळी भरधाव आलेल्या ट्रेलर क्रमांक एमएच ४०/ एन २५४७ च्या चालकाने तिला चिरडले. या भीषण अपघातामुळे घटनास्थळी प्रचंड गर्दी जमली. संतप्त नागरिकांनी रस्त्याचे बांधकाम करणाºया कंत्राटदार तसेच महापालिका प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळेच हा अपघात घडल्याचा आरोप करून घोषणाबाजी केली. तणाव निर्माण होत असतानाच कळमना पोलीस पोहोचले. त्यांनी जमावाला कसेबसे शांत केले. भारतीचा मृतदेह रुग्णालयात रवाना करून पोलिसांनी पंचनामा केल्यानंतर आरोपी ट्रेलर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला.
जागोजागी मातीचे ढिगारे पडून असल्याने नेहमीच छोटे-मोठे अपघात होत असल्याच्या तक्रारी नागरिकांनी या भागातील लोकप्रतिनिधी, महापालिका प्रशासनाकडे केल्या, मात्र त्या दुर्लक्षित करण्यात आल्या. भारतीचा जीव गेल्यानंतर काही वेळेतच बधिर प्रशासनाला जाग आली. लगेच मातीचे ढिगारे साफ करून रस्ता व्यवस्थित करण्याचे काम सुरू झाले. हेच काम आधी झाले असते तर भारतीचा जीव वाचला असता.