नागपूर; मुळकांना पाडण्यासाठी केदारांनी फोन केला होता; नाना गावंडे यांचा खुलासा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2018 11:59 AM2018-03-30T11:59:55+5:302018-03-30T12:00:10+5:30
मी काँग्रेसचा निष्ठावान आहे. कधीच पक्षाच्या विरोधात काम केले नाही. गेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीत आ. सुनील केदार यांनी राजेंद्र मुळक यांना पाडण्यासाठी आपल्याला फोन केला होता. मात्र, आपण मुळकांनाच मदत केली. ते दोन मतांनी विजयी झाले, असा खळबळजनक खुलासा काँग्रेस नेते नाना गावंडे यांनी गुरुवारी जिल्हा काँग्रेसच्या बैठकीत केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मी काँग्रेसचा निष्ठावान आहे. कधीच पक्षाच्या विरोधात काम केले नाही. गेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीत आ. सुनील केदार यांनी राजेंद्र मुळक यांना पाडण्यासाठी आपल्याला फोन केला होता. मात्र, आपण मुळकांनाच मदत केली. ते दोन मतांनी विजयी झाले, असा खळबळजनक खुलासा काँग्रेस नेते नाना गावंडे यांनी गुरुवारी जिल्हा काँग्रेसच्या बैठकीत केला.
विशेष म्हणजे या बैठकीत माजी केंद्रीय मंत्री मुकुल वासनिक, जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळक यांच्यासह जिल्ह्यातील जवळपास सर्वच महत्त्वाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. गावंडे एवढ्यावरच थांबले नाहीत. ते म्हणाले, काही लोक काँग्रेसमध्ये राहून विरोधी पक्षाला मदत करण्याची भूमिका घेतात. त्यामुळे पक्षाची संघटना जिल्ह्यात वाढत नाही. या बैठकीत उपस्थित असलेल्या अनेकांनी लोकसभेत कृपाल तुमाने यांचे काम केले आहे. काही लोक निवडणुकीत कधी कमळ सांगतात, कधी धनुष्यबाण सांगतात. आपली निवडणूक आली की पंजा सांगतात. पण आपण पंजा सोडून कधीच मत मागितले नाही. मुळक यांनी मंत्री असताना कुणाला मदत केली, हेही मला माहीत आहे. काँग्रेसच्या एकातरी कार्यकर्त्याचे काम केले का, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. गावंडे यांची आक्रमक भूमिका पाहता वासनिक यांनी त्यांना टोकले. व्यक्तिगत टीका करू नका. संघटनेबाबत बोला, अशी सूचनाही केली. गावंडे यांनी केदार, मुळक यांच्यावर उघडपणे नेम साधल्यामुळे उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये चांगलीच धुसफूस सुरू झाली होती. या घटनाक्रमामुळे आता शहरानंतर ग्रामीणमध्येही गटबाजी उफाळून येण्याची चिन्हे आहेत.
बैठकीत बाबुराव तिडके यांनी ते केंद्रीय मंत्री नितीन गडकरींकडे एका कामासाठी गेले असताना तुमानेंचा फोन आल्याचा किस्सा सांगितला. यावर वासनिक यांनी त्यांना मध्येच टोकत ते सोडा, मौद्याच्या संघटनेचे बोला, असे सुचविले. सुरेश भोयर म्हणाले, तिकीट कुणालाही द्या, हरकत नाही. पण बूथ पातळीवर काँग्रेस मजबूत व्हावी. नाहीतर आपलेच काही लोक ऊर्जामंत्री बावनकुळे यांच्याकडे जाऊन बसतात. जिल्ह्यात काँग्रेसला आणखी काम करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. कुंदा राऊत म्हणाल्या, पक्षाची संघटना ताकदीने माझ्या सोबतत असती तर हिंगण्यात मला सन्मानजनक मते मिळाली असती. मी एकाकी लढले तरी पक्षाची अनामत वाचविली. पक्षाने दिलेली जबाबदारी पार पाडली. म्हणून मला एआयसीसीवर पाठविण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.
महिला जिल्हाध्यक्ष तक्षशिला वाघधरे म्हणाल्या, प्रत्येक गावात महिलांच्या बूथ कमिटी स्थापन केल्या जात आहे. महिला सक्रिय झाल्या आहेत. येत्या काळात पक्षाने कार्यकर्ता म्हणून राबणाऱ्या सामान्य महिलांनाही तिकीट द्यावे, अशी आग्रही मागणी केली. सुबोध मोहिते रामटेक सोडून गेले तेव्हापासून कुणीही लक्ष दिले नाही. आता मुळक आमच्याकडे लक्ष देत आहेत, अशी भावना रामटेकच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. काटोलमध्ये अनेक वर्षांपासून पक्षाचे काम करीत असतानाही प्रकाश वसू यांच्यासारख्या अनेक निष्ठावंतांना प्रदेश काँग्रेसमध्ये स्थान मिळालेले नाही, अशी उदाहरणे कार्यकर्त्यांनी वासनिक यांच्या लक्षात आणून दिली. बैठकीला माजी आ. एस.क्यु. जमा, सुनिता गावंडे, रवींद्र दरेकर, मुजिब पठाण, बाबा आष्टनकर, जोध गुरुजी, नाना कंभाले, चंद्रपाल चौकसे, हर्षवर्धन निकोसे, सुरेश कुमरे, प्रकाश वसु, संजय जगताप, शांता कुमरे, सचिन किरपान, अरुण हटवार, मनोज तितरमारे, कुंदाताई आमधरे, शकुर नागानी, बशीर पटेल, विलास कडू, श्रीराम काळे आदी उपस्थित होते.
धनशक्ती विरोधात जनशक्ती लढणार : वासनिक
केंद्र व राज्यातील भाजपा सरकारने जनतेला वेठीस धरले आहे. पुढील निवडणूक ही भाजपाच्या धनशक्ती विरोधात जनशक्ती अशीच होणार आहे. अद्याप लोकसभा, विधानसभेचे उमेदवार ठरलेले नाही. ही बैठक निवडणुकीसाठी नसून पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी आहे. काँग्रेसने काय कामे केली ते गावांमध्ये सांगा. बूथ स्तरावर संघटन मजबूत करा, असे आवाहन मुकुल वासनिक यांनी केले.
खचणार नाही : मुळक
मी प्रामाणिकपणे काँग्रेसचे काम करीत आहे. कुणी कितीही आरोप केले तरी खचणार नाही. बूथ स्तरापर्यंत पक्षाचे संघटन पोहचविले आहे. मला कुणी एका गालावर मारले तर संघटनेसाठी मी दुसऱ्या गालावर मार खायला तयार आहे. पक्षासाठी अपमानही सहन करायला तयार आहे, असे राजेंद्र मुळक म्हणाले.