Nagpur: जीवघेण्या नायलॉन मांजाविरोधी मोहीम छेडा, प्र-कुलगुरू डॉ. दुधे यांचे विद्यार्थ्यांना आवाहन
By जितेंद्र ढवळे | Published: January 9, 2024 05:49 PM2024-01-09T17:49:12+5:302024-01-09T17:49:41+5:30
Nagpur News - संक्रांतीच्या पर्वावर मोठ्या प्रमाणात पतंग उडविले जातात. यात नायलॉन मांजाचा वापर होत असल्याने विविध घटना घडत आहेत. त्यामुळे नायलॉन मांजाविरोधी सामाजिक जाणीव निर्माण करण्याचे आवाहन प्र-कुलगुरू डॉ. संजय दुधे यांनी केले.
- जितेंद्र ढवळे
नागपूर - संक्रांतीच्या पर्वावर मोठ्या प्रमाणात पतंग उडविले जातात. यात नायलॉन मांजाचा वापर होत असल्याने विविध घटना घडत आहेत. त्यामुळे नायलॉन मांजाविरोधी सामाजिक जाणीव निर्माण करण्याचे आवाहन प्र-कुलगुरू डॉ. संजय दुधे यांनी केले. भौतिकशास्त्र विभागात राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने नायलॉन मांजाविरोधी जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन मंगळवारी करण्यात आले. यावेळी दुधे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधीक्षक डॉ. अविनाश गावंडे, ‘गाठ’ लघुपटाचे नायक मुकुंद वसुले, भौतिकशास्त्र विभाग प्रमुख डॉ. ओमप्रकाश चिमणकर, एनएसएस समन्वयक डॉ. संजय ढोबळे यांची उपस्थिती होती.
डॉ. दुधे म्हणाले, सर्वच जनजागृतीचा भार सरकार, प्रशासनावर सोडून चालणार नाही. यामध्ये समाजाचा घटक म्हणून आपणा सर्वांना सहभागी व्हावे लागणार आहे. नायलॉन मांजा घेणार नाही. साध्या धाग्याने पतंग उडवू, अशी शपथ घेण्याचे आवाहन त्यांनी केले.
डॉ. अविनाश गावंडे म्हणाले, नायलॉन मांजा हा जीवघेणा असून, त्यामुळे अनेक अपघात घडत आहेत. या अपघातांसाठी आपत्ती व्यवस्थापन पथक तयार करण्यात आले असून, नोंदणी न करता आधी उपचार करण्याची सुविधा सुरू केल्याचे त्यांनी सांगितले. गतवर्षी मांजाने अपघात झाल्याची २७ प्रकरणे आली होती. यावेळी तर महोत्सव सुरू होण्यापूर्वीच आतापर्यंत ७ घटना समोर आल्या, याबाबत त्यांनी चिंता व्यक्त केली. कार्यक्रमाचे संचालन वेंकटेश तिवारी यांनी केले. आभार प्रियंका चरडे यांनी मानले.
गाठ लघुपटाचे सादरीकरण
नायलॉन मांजाचे दुष्परिणाम दर्शविणारा 'गाठ' लघुपट यावेळी दाखविण्यात आला. या कार्यक्रमाला लघुपटाचे निर्माते डॉ. महेंद्र गोहणे, दिग्दर्शक सुबोध आनंद, नायक मुकुंद वसुले, सचिन गिरी, गौरांश गोहने, प्रकाश देवा, श्रीदेवी देवा, संग्रामसिंह ठाकूर, विनय वासनिक, कांचन गोहणे, मेकअप मॅन रमेश वाटकर यांची उपस्थिती होती.