नागपुरात दर तासाला मेट्रो सेवेचा शुभारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2019 10:31 PM2019-06-28T22:31:18+5:302019-06-28T22:32:12+5:30
दर तासाला मेट्रो प्रवासी सेवा आणि अपलाईन मार्गावर मेट्रो सेवेचा शुभारंभ शुक्रवारी करण्यात आला. सकाळी ८ वाजता पहिली फेरी सीताबर्डी येथून खापरी स्टेशनकडे रवाना झाली. त्याचवेळी खापरी मेट्रो स्टेशनवरून मेट्रो रेल्वे सीताबर्डी इंटरचेंज स्टेशनकडे निघाली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : दर तासाला मेट्रो प्रवासी सेवा आणि अपलाईन मार्गावर मेट्रो सेवेचा शुभारंभ शुक्रवारी करण्यात आला. सकाळी ८ वाजता पहिली फेरी सीताबर्डी येथून खापरी स्टेशनकडे रवाना झाली. त्याचवेळी खापरी मेट्रो स्टेशनवरून मेट्रो रेल्वे सीताबर्डी इंटरचेंज स्टेशनकडे निघाली.
यावेळी प्रवाशांचे स्वागत करण्यात आले. त्यांना मेट्रो सेवा आणि कार्डची माहिती देण्यात आली तसेच मेट्रो स्टेशन येथे कार्यरत कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करण्यात आले. सीताबर्डी व खापरी येथून एकाच वेळी निघालेल्या दोन्ही मेट्रो रेल्वे छत्रपती चौक येथे क्रॉस झाल्या तेव्हा प्रवाशांनी आनंद व्यक्त केला. यावेळी महामेट्रोतर्फे संचालक (रोलिंग स्टॉक) सुनील माथूर, संचालक (वित्त) एस. शिवमाथन, महाव्यवस्थापक (प्रशासन) अनिल कोकाटे, महाव्यवस्थापक (ओ अॅण्ड एम) सुधाकर उराडे, कार्यकारी संचालक (रिच-१) देवेंद्र रामटेककर, महाव्यवस्थापक (ट्रॅक) गुरबानी उपस्थित होते.
यावेळी प्रवाशांनी मेट्रो सेवेबद्दल प्रतिक्रिया दिल्या. ज्येष्ठ नागरिक सुभाष कौशीकर म्हणाले, नागपूर मेट्रोचा अभिमान असून प्रवास करताना आनंद होत आहे. मेट्रोमुळे नागपूरचे सौंदर्य बघण्याची संधी मिळाली. लक्ष्मीचंद मेंढे म्हणाले, तरुण पिढीने मेट्रोने जास्तीत जास्त प्रवास करावा. मेट्रो प्रवास सुरक्षित असून एक सुखद अनुभव आहे. गृहिणींनी सांगितले की, मेट्रोने प्रत्यक्षात प्रवास करण्याची संधी मिळाल्याचा आनंद आहे.
पत्रकारांशी संवाद साधताना अनिल कोकाटे म्हणाले, नागरिक बऱ्याच दिवसांपासून मेट्रोच्या फेऱ्यामध्ये वाढ करण्याची मागणी करीत होते ती आता पूर्ण झाली आहे. जयप्रकाशनगर आणि राहाटे कॉलनी मेट्रो स्टेशनवरून लवकरच प्रवासी सेवा सुरू करण्यात येणार आहे.