नागपूरच्या विधी विद्यापीठात विद्यार्थिनींशी वाईट वर्तणूक?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2017 01:08 PM2017-12-05T13:08:06+5:302017-12-05T13:15:25+5:30
एका विद्यार्थिनीच्या वडिलांनी पाठविलेल्या पत्रानंतर महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठाला मोठा धक्का बसला आहे. २०१६ मध्ये स्थापना झालेल्या या विद्यापीठाच्या दुसऱ्या बॅचमधील एका विद्यार्थिनीने काही महिन्यातच विद्यापीठ सोडले आहे. तिच्या वडिलांनी पत्राद्वारे विद्यापीठाला याची माहिती दिली असून, येथे असलेला शिस्तीचा अभाव व विद्यार्थिनींसोबत असलेल्या वाईट वर्तणुकीमुळे हे पाऊल उचलले असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
आॅनलाईन नागपूर
नागपूर : एका विद्यार्थिनीच्या वडिलांनी पाठविलेल्या पत्रानंतर महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठाला मोठा धक्का बसला आहे. २०१६ मध्ये स्थापना झालेल्या या विद्यापीठाच्या दुसऱ्या बॅचमधील एका विद्यार्थिनीने काही महिन्यातच विद्यापीठ सोडले आहे. तिच्या वडिलांनी पत्राद्वारे विद्यापीठाला याची माहिती दिली असून, येथे असलेला शिस्तीचा अभाव व विद्यार्थिनींसोबत असलेल्या वाईट वर्तणुकीमुळे हे पाऊल उचलले असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. या प्रकरणामुळे विद्यापीठात मोठी खळबळ उडाली आहे.
संबंधित विद्यार्थिनीने ‘क्लॅट’ ही परीक्षा उत्तीर्ण करून महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठात प्रवेश घेतला होता. मात्र नोव्हेंबर महिन्यात तिने विद्यापीठ सोडले. यानंतर तिच्या वडिलांनी प्रशासनाला पत्र लिहून तिच्यासोबत घडलेल्या प्रकाराची माहिती दिली व ‘टीसी’ जारी करण्याची मागणी केली.
प्रवेशाच्या चार महिन्यानंतर तिने प्रवेश रद्द केला असल्यामुळे काही रक्कम कापून १ लाख १३ हजार रुपये परत करण्यात आले आहे. तसेच बारावीची गुणपत्रिका आणि ‘टीसी’ यांच्यासह इतर मूळ कागदपत्रेदेखील वापस करण्यात आली. नियमानुसार एकदा प्रवेश झाल्यानंतर प्रवेश शुल्क व जुन्या महाविद्यालयाची ‘टीसी’ परत करता येत नाही. विद्यार्थी उत्तीर्ण आहे की अनुत्तीर्ण, असा उल्लेख करून विद्यापीठातर्फे नवीन ‘टीसी’ जारी करण्यात येते.
कुलसचिवांचे मौन
यासंदर्भात विद्यापीठ प्रशासनाने मौन साधले आहे. ‘लोकमत’च्या प्रतिनिधीने विद्यापीठात जाऊन माहिती घेतली असता, कुलसचिव डॉ. एन. एम. साकरकर तेथे नव्हते. दूरध्वनीवर संपर्क साधला असता, त्यांनी बोलण्यास नकार दिला व मंगळवारी येण्याबद्दल सांगितले.
पोलीस तक्रार का नाही?
या प्रकरणात पोलीस तक्रार न झाल्यामुळे आणखी प्रश्न उपस्थित होत आहेत. जर प्रकरण इतके गंभीर आहे, तर त्याची पोलीस तक्रार का करण्यात आली नाही? केवळ पत्र लिहून प्रवेश रद्द करा करण्यात आला? हे प्रश्न अनुत्तरितच आहेत. या प्रकरणात न्यायालयामध्ये दाद मागणार असल्याचे विद्यार्थिनीच्या वडिलांनी स्पष्ट केले आहे.