गडकरी-ठाकरेंच्या विरोधात हातमजूर, ड्रायव्हर अन् शेतकरी; निवडणुकीच्या रिंगणात उच्चशिक्षितांचा दुष्काळ

By योगेश पांडे | Published: April 1, 2024 11:45 PM2024-04-01T23:45:17+5:302024-04-01T23:50:23+5:30

केवळ ३० टक्के ‘पीजी’! नागपूर लोकसभा मतदारसंघात एकूण २६ उमेदवार रिंगणात आहेत. त्यात एक हातमजूर, एक कामगार, एक शेतकरी, ड्रायव्हर यांचादेखील समावेश आहे.

Nagpur Lok Sabha Constituency: Nitin Gadkari, no highly educated candidate against Vikas Thackeray | गडकरी-ठाकरेंच्या विरोधात हातमजूर, ड्रायव्हर अन् शेतकरी; निवडणुकीच्या रिंगणात उच्चशिक्षितांचा दुष्काळ

गडकरी-ठाकरेंच्या विरोधात हातमजूर, ड्रायव्हर अन् शेतकरी; निवडणुकीच्या रिंगणात उच्चशिक्षितांचा दुष्काळ

नागपूर : लोकसभा निवडणुकांसाठी नागपूर मतदारसंघातून भाजपचे उमेदवार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व काँग्रेसचे उमेदवार आमदार विकास ठाकरे यांच्यात मोठी टक्कर आहे. मात्र, या दोन्ही उमेदवारांना निवडणुकीच्या रिंगणात चक्क हातमजूर, ड्रायव्हर व शेतकरी उमेदवारांनीदेखील आव्हान दिले आहे.

आश्चर्याची बाब म्हणजे नागपूरची ओळख शैक्षणिक हब अशी झाली असताना ६० टक्के उमेदवारदेखील पदवीधर नसल्याचे चित्र आहे. केवळ ३० टक्के उमेदवार पोस्ट ग्रॅज्युएट आहेत. राजकारणातील उच्चशिक्षितांचा टक्का वाढावा, अशी अपेक्षा विविध पक्षांमधील नेते अनेकदा व्यक्त करताना दिसून येतात. राजकीय पक्षांकडून तर हव्या त्या संख्येत उच्चशिक्षित उभे नाहीच. निवडणूक आयोगातर्फे उमेदवारांच्या शिक्षणाचा तपशील उपलब्ध करून देण्यात आला आहे. ‘लोकमत’ने उपलब्ध शपथपत्रांची विस्तृत पाहणी केली असता वरील बाब समोर आली आहे.

नागपूर लोकसभा मतदारसंघात एकूण २६ उमेदवार रिंगणात आहेत. त्यात एक हातमजूर, एक कामगार, एक शेतकरी, ड्रायव्हर यांचादेखील समावेश आहे. एक उमेदवार शेतकरी असून, तो तासिका तत्त्वावरील प्राध्यापकदेखील आहे. ४२ टक्के उमेदवारांच्या उत्पन्नाचे साधन व्यवसाय आहे. तर दोन पेन्शनर्सदेखील निवडणुकीत उभे झाले आहेत. चार उमेदवार खासगी काम करतात.

४६ टक्के उमेदवारांकडे पदवीच नाही

यातील ४६ टक्के उमेदवारांचे पदवीपर्यंत शिक्षणच झालेले नाही. तर ३४ टक्के उमेदवार दहावी किंवा बारावीपर्यंतच शिकलेले आहेत. १६ टक्के उमेदवार हे दहावी उत्तीर्ण आहेत. ३१ टक्के उमेदवार हे पदव्युत्तर शिक्षित आहेत. तर अवघ्या एका उमेदवाराकडे मानद आचार्य पदवी आहे. एकही उमेदवार निरक्षर नाही, ही त्यातल्या त्यात समाधानाची बाब आहे. एका उमेदवाराने शिक्षणाचा तपशीलच दिलेला नाही. एक उमेदवार दहावी अनुत्तीर्ण आहे तर एक अकरावीपर्यंत शिकलेला आहे.

विधी शाखेचे सर्वाधिक पदवीधर

एकूण पदवीधर उमेदवारांमध्ये विधी तसेच विज्ञान विषयांतील सर्वाधिक पदवीधर आहेत. एकूण पदवीधरांच्या तुलनेत ४३ टक्के उमेदवार हे विधी पदवीधर तरे ३६ टक्के टक्के उमेदवार हे विज्ञान विषयातील पदवीधर आहेत. रिंगणात असलेल्या एकूण उमेदवारांच्या तुलनेत हे प्रमाण अनुक्रमे १९ व १६ टक्के इतके आहे.

उच्चशिक्षितांकडून पुढाकारच नाही

उच्चशिक्षितांनी राजकारणात आले पाहिजे, असा एक मोठा मतप्रवाह आहे. लोकशाहीत अपक्ष म्हणून आपले आव्हान उभे करण्यात पदवीधरांमध्ये उदासीनताच दिसून येत आहे. नागपूर लोकसभा मतदारसंघात एकूण ११ उमेदवार अपक्ष म्हणून उभे आहेत. यातील ५४ टक्के उमेदवार हे पदवी किंवा पदव्युत्तर शिक्षण झालेले आहेत. राजकीय पक्षांच्या आकडेवारीकडे लक्ष दिले असता, त्यांच्यातील ५३ टक्के उमेदवार हे पदवीधर आहेत.

उमेदवारांचे शिक्षण
शिक्षण : उमेदवार
आचार्य : १
पदव्युत्तर : ७
पदवी : ६
बारावी : ४
१०वी ते १२वी : ४
दहावीहून कमी : १
पदविका : २
निरंक : १

विषयनिहाय पदवीधर
विषय : उमेदवार
वाणिज्य : २
कला : १
विज्ञान : ५
विधी : ६


उत्पन्नाचे साधन
व्यवसाय : ११
खासगी काम : ४
हातमजुरी : १
कामगार : १
शेतकरी : २
वकील : ४
ड्रायव्हर : १
पेन्शनर : २

Web Title: Nagpur Lok Sabha Constituency: Nitin Gadkari, no highly educated candidate against Vikas Thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.