Nagpur Lok Sabha Results 2024 : गडकरींची नागपुरातून हॅटट्रीक,१.३७ लाखांचे मताधिक्य
By योगेश पांडे | Published: June 4, 2024 08:23 PM2024-06-04T20:23:04+5:302024-06-04T20:23:47+5:30
Nagpur Lok Sabha Results 2024 : एकूण मतदानाच्या ५४.०५ टक्के मत गडकरी यांच्याच पारड्यात
योगेश पांडे - नागपूर
लोकमत न्यूज नेटवर्क
Nagpur Lok Sabha Results 2024 : संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या नागपूर मतदारसंघात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आपला दबदबा कायम राखत विजय मिळविला आहे. त्यांची ही हॅटट्रीक ठरली आहे. एकूण मतदानाच्या ५४.०५ टक्के मत गडकरी यांच्याच पारड्यात आली आहेत. मागील वेळच्या तुलनेत गडकरी यांचे मताधिक्य १.५६ टक्क्यांनी घटले आहे.
मंगळवारी मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर पहिल्या फेरीपासूनच गडकरींनी आघाडी घेतली होती व अखेरच्या फेरीपर्यंत ही आघाडी कायम राहिली. प्रत्येक फेरीनंतर त्यांचे मताधिक्य वाढतच गेले. नागपुरच्या रिंगणात एकूण २६ उमेदवार उभे होते व १९ एप्रिल रोजी पहिल्या टप्प्यात मतदान झाले होते. नागपुरात एकूण १२ लाख ७ हजार ४५५ इतके मतदान झाले. नितीन गडकरी यांना एकूण ६ लाख ५५ हजार २७ मतं पडली होती तर कॉंग्रेसचे विकास ठाकरे यांना ५ लाख १५ हजार ९४१ मते मिळाली. गडकरी यांचा एकूण ५ लाख ३७ हजार ६०३ इतक्या मतांनी विजय झाला.
‘एक्झिट पोल्स’चे अंदाज खरे ठरले
नागपूर लोकसभा मतदारसंघात युतीचेच उमेदवार विजयी होतील, असा अंदाज ‘एक्झिट पोल्स’मधून वर्तविण्यात आला होता. निकालानंतर हा अंदाज खरा ठरल्याचे दिसून आले.
नागपुरात गडकरींच्या विकासाची जादू चालली
एकेकाळी कॉंग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या नागपूर लोकसभा मतदारसंघात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना मिळालेल्या दणदणीत विजयामुळे त्यांचे केंद्रातील वजन आणखी वाढले आहे. या विजयामुळे गडकरी यांनी एक नवा इतिहास रचला आहे. गडकरी यांच्या विजयाचे संपूर्ण श्रेय त्यांच्या विकासकारणाला जात असून नागपुरात झालेल्या विकासकामांची पावती मतदारांनी मतांच्या रुपात त्यांना दिलेली आहे.
नागपुरला विकसित शहर बनविणार
मतदारांचे प्रेम व त्यांचा विश्वास यामुळेच हा विजय मिळाला आहे. नागपूरच्या सर्वांगीण विकासासाठी नेहमीच कटिबद्ध राहील. देशातील विकसित शहरांच्या यादीत नागपूरला स्थान मिळवून देण्यासाठी सदैव प्रयत्नशील आहे. कार्यकर्त्यांचे प्रेम व आपला विश्वास हीच माझी मोठी ताकद आहे, अशी प्रतिक्रिया नितीन गडकरी यांनी दिली.