नागपुरातील उमेदवारांचे सरासरी वय ४८ वर्षे; सर्वांत तरुण उमेदवार ‘३०’चा, तर वयस्क ‘७७’ चे
By योगेश पांडे | Published: April 2, 2024 11:54 PM2024-04-02T23:54:56+5:302024-04-02T23:55:19+5:30
Loksabha Election 2024; तरुणतुर्कांचे प्रस्थापितांना आव्हान, निवडणूक आयोगातर्फे उमेदवारांच्या वयाचा तपशील उपलब्ध करून देण्यात आला आहे. ‘लोकमत’ने सर्व उपलब्ध शपथपत्रांची विस्तृत पाहणी केली असता वरील बाब समोर आली आहे
नागपूर : साधारणत: पन्नाशी उलटल्यानंतरच खऱ्या राजकीय कारकीर्दीला सुरुवात होते. निवडणुकांत उतरण्याची सुरुवात या टप्प्यानंतर होते असे एरवी म्हणतात. मात्र, गेल्या काही काळापासून ही धारणा मोडीत निघाली असून नागपूर लोकसभा मतदारसंघातील बहुतांश उमेदवार हे पन्नाशीच्या आतीलच आहेत. जर एकूण सरासरी काढली तर नागपुरातील उमेदवारांचे सरासरी वय हे ४८ वर्षे इतके आहे. २०१९ च्या निवडणुकीत हेच सरासरी वय ४६ इतके होते. नागपुरातील सर्वांत तरुण उमेदवार हा ३० वर्षांचा आहे, तर सर्वांत वयस्क उमेदवार ७७ वर्षांचे आहेत, हे विशेष.
निवडणूक आयोगातर्फे उमेदवारांच्या वयाचा तपशील उपलब्ध करून देण्यात आला आहे. ‘लोकमत’ने सर्व उपलब्ध शपथपत्रांची विस्तृत पाहणी केली असता वरील बाब समोर आली आहे. नागपूर लोकसभा मतदारसंघातून एकूण २६ उमेदवार भाग्य अजआवत आहेत. मागील अनेक निवडणुकांपासून तरुण मतदारांमध्ये बरीच जागृती आली आहे. तरुणाईच्या मतांना महत्त्व आले असून यामुळेच राजकीय पक्षांचा चेहरादेखील तरुण होत आहे. त्याप्रमाणे अपक्ष म्हणून उतरण्यासाठीदेखील पन्नाशीच्या आतील उमेदवारांमध्ये उत्सुकता दिसून आली. नागपुरातील १४ (५४ टक्के) उमेदवार हे ५० हून कमी वय असलेले आहेत, तर ६ (२३ टक्के) उमेदवारांचे वय हे चाळीस किंवा त्याहून कमी आहे. तिशीचे दोन उमेदवार रिंगणात आहेत.
चाळिशीच्या आतील चार अपक्ष
मतदारसंघात चाळिशीच्या आतील २३ टक्के उमेदवार रिंगणात आहेत. यातील ६६ टक्के उमेदवार हे पक्ष आहेत, तर राजकीय पक्षांकडून चाळिशीच्या आत वय असलेला केवळ एकच उमेदवार उतरविण्यात आला आहे, तर चाळिशीच्या आतील अवघा एक अपक्ष उमेदवार निवडणुकीत उभा ठाकला आहे. ११ अपक्ष उमेदवारांपैकी ३ (२७ टक्के) उमेदवार हे ४१ ते ५० या वयोगटातील आहेत, तर चार उमेदवार हे पन्नाशीहून अधिक वयाचे आहेत.
वयानुसार उमेदवारांची संख्या
वय उमेदवार
२५ ते ३० : २
३१ ते ४० : ६
४१ ते ५० : ८
५१ ते ६० : ८
६० हून अधिक : २
चार उमेदवारांविरोधात गुन्हे
राजकीय पक्षांच्या उमेदवारांविरोधातील गुन्हे हा मागील काही काळापासून चर्चेचा विषय आहे. नागपूर मतदारसंघात उभे असलेल्या चार उमेदवारांविरोधात विविध प्रकारचे गुन्हे दाखल आहेत. यातील बहुतांश गुन्हे हे आंदोलनांशी निगडित किंवा राजकीय स्वरूपाचे आहेत. या चार उमेदवारांविरोधात एकूण १६ खटले सुरू आहेत.