नागपुरात चार लाखाच्या कर्जाच्या नादात साडेचार लाख गमावले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2019 10:59 AM2019-07-09T10:59:05+5:302019-07-09T11:01:30+5:30
र लाखाचे कर्ज मिळवण्याच्या नादात एका महिलेने आपले साडेचार लाख रुपये गमविले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : चार लाखाचे कर्ज मिळवण्याच्या नादात एका महिलेने आपले साडेचार लाख रुपये गमविले. सायबर टोळीने या महिलेला आधी कर्ज देण्याच्या नावाखाली आणि नंतर तिचे घेतलेले पैसे परत करण्याच्या नावाखाली तिची रक्कम हडपली. प्रमोदिता रामटेके (वय ५२) असे पीडित महिलेचे नाव असून, त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून गिट्टीखदान पोलिसांनी शनिवारी सायबर टोळीविरुद्ध गुन्हा दाखल केला.
रामटेके या गिट्टीखदानमधील व्हेटरनरी कॉलेजच्या मागे राहतात. १२ सप्टेंबर २०१६ ला त्यांना एक फोन आला. फोन करणाऱ्याने आपले नाव आणि पत्ता गिरीश रामचंद्र चंडावले (रा. यशवंत नगर, ज्योतीलिंग सर्व्हिस सेंटर, सांगली) असा सांगितले. आमच्या कंपनीकडून केवळ दोन टक्के व्याजदराने झटपट कर्ज दिले जाते, अशी थाप मारली. चार लाखाचे कर्ज घेण्यासाठी रामटेके यांच्या ई-मेल आयडीवर कर्जासाठी प्रोफार्म पाठविला. तो भरून घेतल्यानंतर आरोपी कुलदीप धर्म पाल (रा. रामसिंग कॉलनी, हेंन्डसी हिस्सार) याचा आणि नंतर अवतारसिंग अनुपमसिंग (रा. विमोपाल अमृतसर, पंजाब) याचा फोन आला. तुमचे कर्ज मंजूर झाले असून, ते तुमच्या खात्यात जमा करण्यासाठी अॅग्रीमेंट करायचे आहे म्हणून सुरूवातीला जुजबी रक्कम आपल्या खात्यात जमा करायला सांगितली. त्यानंतर सिक्युरिटी फी, लोन इन्शुरन्स तसेच नंतर वेगवेगळ्या नावाखाली आरोपींनी रामटेके यांना रक्कम जमा करायला सांगितली. दीड ते दोन लाख रुपये जमा करूनही आरोपी कर्जाची रक्कम देत नसल्याचे पाहून रामटेके यांनी त्यांना आपली रक्कम परत मागितली. त्यानंतर रक्कम परत करण्याच्या नावाखाली आरोपींनी पुन्हा त्यांच्याकडून वेगवेगळ्या नावाखाली रक्कम हडपणे सुरू केले. १२ सप्टेंबर २०१६ ते २४ आॅगस्ट २०१७ या कालावधीत आरोपींनी आपल्या खात्यात रामटेके यांच्याकडून ४ लाख, २९ हजार, ५०० रुपये जमा करून घेतले. मात्र, त्यांना ना कर्जाची रक्कम दिली ना त्यांचे घेतलेले पैसे परत केले. आरोपी आपल्याला फसवत असल्याचे वर्षभरानंतर ध्यानात आल्याने त्यांनी गिट्टीखदान पोलिसांकडे आरोपींची तक्रार नोंदवली. पोलिसांनी प्रदीर्घ चौकशी करून फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.
आरोपी संपर्क क्षेत्राबाहेर
रामटेके यांनी नंतर रक्कम देण्यास नकार देऊन पोलिसांकडे तक्रार करण्याचा धाक दाखवताच आरोपींनी रामटेकेंसोबत आपला संपर्क तोडला. अलीकडे त्यांचे सर्व संपर्क क्रमांक संपर्क क्षेत्राबाहेर असल्याची कॅसेट ऐकू येते. गिट्टीखदान पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.