नागपुरात मनोरुणाने घेतला पोलिसांच्या ‘पेट्रोलिंग व्हॅन’चा ताबा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2019 12:05 AM2019-07-02T00:05:23+5:302019-07-02T00:08:02+5:30
गुन्हेगारांच्या शोधार्थ फिरणाऱ्या पोलिसांच्या ‘पेट्रोलिंग व्हॅन’चा ताबा घेऊन एका मनोरुग्ण तरुणाने सोमवारी सायंकाळी पोलिसांची चांगलीच भंबेरी उडवली. धावपळ करून पोलिसांनी व्हॅनच्या ड्रायव्हिंग सीटवर बसलेल्या मनोरुग्णाला व्हॅनच्या खाली उतरविले. त्याची कानशेकणी केली आणि त्याला हुसकावून लावले. मेडिकल चौकात सोमवारी सायंकाळी ६ च्या सुमारास घडलेल्या या घटनेमुळे परिसरात प्रचंड खळबळ निर्माण झाली होती.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : गुन्हेगारांच्या शोधार्थ फिरणाऱ्या पोलिसांच्या ‘पेट्रोलिंग व्हॅन’चा ताबा घेऊन एका मनोरुग्ण तरुणाने सोमवारी सायंकाळी पोलिसांची चांगलीच भंबेरी उडवली. धावपळ करून पोलिसांनी व्हॅनच्या ड्रायव्हिंग सीटवर बसलेल्या मनोरुग्णाला व्हॅनच्या खाली उतरविले. त्याची कानशेकणी केली आणि त्याला हुसकावून लावले. मेडिकल चौकात सोमवारी सायंकाळी ६ च्या सुमारास घडलेल्या या घटनेमुळे परिसरात प्रचंड खळबळ निर्माण झाली होती.
गुन्हेगारांच्या शोधार्थ पोलिसांच्या पेट्रोलिंग व्हॅन (गस्ती पथके) शहरातील विविध भागात फिरतात. अशाच प्रकारे अजनीचे एक पोलीस पथक गस्त करीत सोमवारी सायंकाळी मेडिकल चौकात पोहचले. व्हॅन रस्त्याच्या बाजूला उभी करून पोलीस बाजूच्या गर्दीच्या ठिकाणी कोणता गुन्हेगार आहे काय, त्याची चाचपणी करू लागले. घाईगडबडीत उतरताना व्हॅन चालकाने चावी स्टेअरिंगलाच लावून ठेवली. अचानक व्हॅनच्या सायलेन्सरमधून जोरात धूर निघू लागला. आवाज ऐकून व्हॅन दुसºयाच कुणीतरी सुरू केल्याचे लक्षात येताच हादरलेल्या पोलिसांनी व्हॅनच्या ड्रायव्हिंग सीटकडे धाव घेतली. तेथे पोलिसांना एक तरुण स्टेअरिंगचा ताबा घेऊन बसलेला दिसला. पोलिसांनी त्याला अक्षरश: खेचूनच बाहेर काढले. त्यानंतर त्याची चांगली कानशेकणी केली. वर्दळीचे ठिकाण असल्यामुळे अल्पावधीतच तेथे मोठी गर्दी जमली. पोलीस त्याच्यावर कारवाईच्या मानसिकतेत होते. मात्र, गर्दीतील काही जणांनी तो तरुण मनोरुग्ण असून, दिवसभर मेडिकल चौकात वेडसरासारखे चाळे करीत फिरतो, असे सांगितले. त्यामुळे पोलिसांनी त्याला कारवाई न करता सोडून दिले.
मोठा अनर्थ टळला
मनोरुग्णाने पोलीस व्हॅन सुरू केली. एक्सीलेटरही दाबले. मात्र, सुदैवाने त्याने गिअर बदलवला नाही. अन्यथा व्हॅन मागे किंवा पुढे झाली असती तर वर्दळीच्या मेडिकल चौकात भयावह दुर्घटना घडली असती. प्रत्यक्षदर्शी सूत्रांनुसार, त्या मनोरुग्ण तरुणाने व्हॅनचा ताबा घेण्यापूर्वी चौकात उभी असलेल्या एका कारची नंबरप्लेट काढून घेतली होती.