नागपुरात मटका अड्ड्यावर छापा, युवक जखमी, ११ सटोडे ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2019 10:10 PM2019-04-02T22:10:18+5:302019-04-02T22:11:15+5:30
गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा पथकाने गणेशपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका सट्टा अड्ड्यावर सोमवारी दुपारी छापा घालून ११ जणांना पकडले. त्यांच्याकडून १४ हजार रुपये जप्त करण्यात आले. याच कारवाईदरम्यान एका पोलिसाने आपल्यावर ब्लेडने वार करून गंभीर जखमी केल्याचे फोटो मोहम्मद वसिम ऊर्फ गोलू नामक तरुणाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल केल्याने सर्वत्र खळबळ उडाली होती. तर, सट्टा अड्ड्यावर कारवाईसाठी धडकलेल्या पोलिसांच्या कारवाईपासून स्वत:चा बचाव करण्यासाठी वसिमने स्वत:च स्वत:ला जखमी करून घेतल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा पथकाने गणेशपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका सट्टा अड्ड्यावर सोमवारी दुपारी छापा घालून ११ जणांना पकडले. त्यांच्याकडून १४ हजार रुपये जप्त करण्यात आले. याच कारवाईदरम्यान एका पोलिसाने आपल्यावर ब्लेडने वार करून गंभीर जखमी केल्याचे फोटो मोहम्मद वसिम ऊर्फ गोलू नामक तरुणाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल केल्याने सर्वत्र खळबळ उडाली होती. तर, सट्टा अड्ड्यावर कारवाईसाठी धडकलेल्या पोलिसांच्या कारवाईपासून स्वत:चा बचाव करण्यासाठी वसिमने स्वत:च स्वत:ला जखमी करून घेतल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.
गणेशपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत गेल्या अनेक दिवसांपासून एक मटका अड्डा सुरू होता. त्यावर सटोड्यांची नेहमी वर्दळ राहायची. गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा पथकाने (एसएसबी) त्या सट्टा अड्ड्यावर सोमवारी दुपारी छापा घातला. तेथे सट्ट्याची खयवाडी-लगवाडी करणारे ११ सटोडे पोलिसांना सापडले. पोलिसांनी त्यांच्याकडून १४ हजार रुपये आणि मोबाईल जप्त केले. कमल डोंगरवार, लक्ष्मण पराते, इम्रान खान, प्रतीक मसराम, राहुल कुटीकर, यश तिवारी हे सर्व सट्टा अड्ड्यावर मटक्याची खयवाडी करताना पोलिसांना आढळले. त्यांना ताब्यात घेऊन एसएसबीचे पथक पोलीस ठाण्यात नेत होते. दरम्यान या अड्ड्याचा सूत्रधार वसिम असल्याचे कळाल्याने हवालदार मुकुंदा गारमोडे त्याच्याकडे धावले. ते पाहून वसिमने स्वत:च्या हातावर ब्लेडने वार करून जखमी केल्याचे पोलीस सांगतात. दुसरीकडे हवालदार मुकुंदा यांनी पैसे मागितले, दिले नाही म्हणून त्यांनी ब्लेडने हल्ला केल्याचा आरोप वसिमने लावला होता. हवलदार मुकुंदा दारूच्या नशेत असल्याचाही आरोप मुकुंदाने लावला होता. जखमी अवस्थेतील फोटोही वसिमने व्हायरल केले होते. त्यामुळे एकच खळबळ निर्माण झाली होती.