नागपुरात आयुक्तांच्या दाव्यांची महापौर करणार चौकशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2020 10:46 AM2020-08-25T10:46:32+5:302020-08-25T10:48:49+5:30
महापौर संदीप जोशी यांनी प्रशासनाने केलेल्या दाव्याची चौकशी करण्यासाठी विविध समित्यांची सोमवारी घोषणा केली. यातून प्रशासन व पदाधिकारी यातील वाद वाढण्याची शक्यता आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूरमध्ये कोविडचा प्रादुर्भाव दररोज वाढत असून मृत्यूसंख्या ५०० च्या घरात पोहचली आहे. मनपा प्रशासनाकडून रुग्णांसाठी व्यवस्था असल्याचा दावा केला जात आहे. तर कोविड रुग्णांसाठी खासगी आणि शासकीय रुग्णालयांमध्ये खाटा उपलब्ध नाहीत, कोविड केअर सेंटरमध्ये पण रुग्णांना पाठविले जात नाही, असे पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. दावे-प्रतिदावे विचारात घेता महापौर संदीप जोशी यांनी प्रशासनाने केलेल्या दाव्याची चौकशी करण्यासाठी विविध समित्यांची सोमवारी घोषणा केली. यातून प्रशासन व पदाधिकारी यातील वाद वाढण्याची शक्यता आहे.
समित्यांमार्फत मनपाद्वारे नागपूरमध्ये कोविड-१९ च्या रुग्णांसाठी खासगी आणि शासकीय रुग्णालयांत केलेली खाटांची व्यवस्था, कोविड केअर सेंटरमध्ये उपलब्ध खाटांची संख्या, हॉटेल्स आणि मनपाच्या रुग्णालयात खाटांची व्यवस्था याची पाहणी करून आपला अहवाल बैठकीत सादर करतील. मनपा सभेत ज्येष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी यांनी मांडलेल्या स्थगन प्रस्तावावर संदीप जोशी यांनी कोविड - १९ बद्दल समन्वय करण्यासाठी सर्वपक्षीय नगरसेवकांची समिती गठित केली आहे. या समितीची बैठक सोमवारी मनपा मुख्यालयात पार पडली. वैद्यकीय अधिकारी डॉ. योगेंद्र सवाई यांनी २४ खासगी रुग्णालयांत १,८७६ खाटांची व्यवस्था करण्यात आली असून सद्य:स्थितीत ५७५ बेड्स उपलब्ध असल्याचे सांगितले.
मेयो, मेडिकल रुग्णालयात १२०० खाटांची व्यवस्था आहे. जीएमसीमध्ये ६०० बेड्स आहे त्यात ३४० रुग्ण भरती आहेत, आयजीएमसीमध्ये ६०० बेड्स आहेत त्यात २९५ रुग्ण भरती आहे, दोन्ही हॉस्पीटलमध्ये आॅक्सीजनची व्यवस्था उपलब्ध आहे. तसेच त्यांनी मनपा व्दारा संचालित कोविड टेस्टिंग सेंटरची माहिती दिली.
अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी सांगितले की, आमदार निवास, पोलिस क्वॉर्टर पाचपावली, व्हीएनआयटी होस्टेल, सिम्बॉयसीस होस्टेल आणि वनामतीमध्ये २८०० खाटांची व्यवस्था करण्यात आली आहे.
याव्यतिरिक्त ४,७३० खाटांची व्यवस्था रुग्णांसाठी सज्ज आहे. तसेच ३,३५६ खाटांची व्यवस्था प्रस्तावित आहे. हॉटेल्समध्येसुद्धा कोविड केअर सेंटरची परवानगी देण्यात आली आहे. प्रशासनाचे दावे आणि वर्तमान परिस्थितीमध्ये मोठी तफावत असल्याने सत्य परिस्थिती जाणण्यासाठी समित्या गठित करण्यात येत आहे. समित्या सत्य परिस्थितीची पाहणी करून आपला रिपोर्ट देतील, अशी माहिती संदीप जोशी यांनी दिली. बैठकीत आमदार प्रवीण दटके, यांच्यासह समितीतील सदस्य उपस्थित होते.