महापौरांचा घोषणांचा सपाटा, निवडणुकीपूर्वी घोषणा पूर्ण होणार का?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2021 01:24 PM2021-10-31T13:24:56+5:302021-10-31T15:45:34+5:30
महापौरपद स्वीकारताना दयाशंकर तिवारी यांनी ७५ प्राथमिक रुग्णालयांसह अनेक योजनांची घोषणा केली होती. मात्र, मनपाची आर्थिक स्थिती आणि निवडणुकीला उरलेला तीन महिन्यांचा कालावधी बघता या घोषणा पूर्ण होणार का असा प्रश्न शहरातील नागरिकांना पडला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मनपात मागील १५ वर्षांपासून भाजपाची सत्ता आहे. या कालावधीत केलेल्या घोषणांची यादी मोठी आहे. त्यात महापौरपद स्वीकारताना दयाशंकर तिवारी यांनी ७५ प्राथमिक रुग्णालयांसह अनेक योजनांची घोषणा केली होती. मात्र, मनपाची आर्थिक स्थिती आणि निवडणुकीला उरलेला तीन महिन्यांचा कालावधी बघता या घोषणा पूर्ण होणार का असा प्रश्न शहरातील नागरिकांना पडला आहे.
फेब्रुवारीमध्ये महापालिकेच्या निवडणुका होणार आहेत. परंतु, २४ तास पाणीपुरवठा प्रकल्प अद्याप पूर्ण होऊ शकला नाही. सिमेंट रस्त्यांची कामे, अर्धवट कामे यामुळे महापालिकेवर सर्वसामान्य नागपूरकर नाराज आहेत. मनपाला करापासून मिळणारे उत्पन्न अत्यल्प आहे. भाडेवाडीमध्ये सुरू असलेला प्रकल्प अर्धवट आहे. शहरातील रस्त्यांची दुरूस्ती झालेली नाही. रस्त्याच्या कामासाठी २६ कोटी रुपये मंजूर केले असले तरी प्रत्यक्षात मात्र रस्त्याच्या कामांना सुरुवात करण्यात आली नाही.
शहरातील मैदाने, उद्याने विकसित करून त्या ठिकाणी सौंदर्यीकरण झालेले नाही. शिवाय ऑरेंज सिटी प्रकल्प, साई क्रीडा केंद्र, कचऱ्यापासून विद्युत निर्मिती प्रकल्प, जलशुद्धीकरण प्रकल्प, बीओटी तत्त्वावर महालातील व सक्करदरातील बुधवार बाजार, कमाल चौक येथील व्यापारी संकुल, २१३ कोटींची अमृत योजना, भूमिगत गटार योजना, प्रधानमंत्री आवास योजना, घरकूल आणि अंबाझरी ओपन थिएटर, जरीपटका मार्केट, सोख्ता भवनमध्ये व्यापारी संकुल, महिला उद्योजिका भवन, शहरातील चित्रकार, शिल्पकारांसाठी कलानगराची निर्मिती व आर्ट गॅलरी या गेल्या पाच वर्षांतील सत्तापक्षाने केलेल्या घोषणा अजूनही केवळ कागदावर आहेत.
विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी नोव्हेंबरमध्ये आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे आणि त्यानंतर मनपा निवडणुकीसाठी आचारसंहिता लागेल. त्यामुळे महापौरांकडे केवळ एक ते दीड महिना आहे. इतक्या कमी काळात दिलेली आश्वासने पूर्ण करण्याचे मोठे आव्हान त्यांच्यासमोर आहे. काही योजना सुरू झाल्या तर काहींचे भूमिपूजन झाले आहे. यात सहा झोनमध्ये इंग्रजी माध्यमांच्या शाळा, विद्यार्थ्यांना टॅबचे वाटप, ज्येष्ठ नागरिकांसाठी महापालिकेत कक्ष, स्पर्धा परीक्षांसाठी मार्गदर्शन केंद्र,
सोनेगाव व गांधीबाग तलाव सौंदर्यीकरण भूमिपूजन, मॉडेल मिलजवळील रस्ता भूमिपूजन, गांधीबाग उद्यान सौंदर्यीकरण यांचा समावेश आहे.
या घोषणा कागदावरच
- ७५ वंदेमातरम् प्राथमिक रुग्णालय (हेल्थ पोस्ट )
- माजी खासदार स्व. अनसूयाबाई काळे समुपदेशन केंद्र
- अतिक्रमणमुक्त फुटपाथ
- ई हॉकर्स धोरण
- ७५ स्मार्ट उद्याने
- लाडली लक्ष्मी योजना
- सुपर ३० च्या धर्तीवर सुपर ७५
- जनावरांसाठी वाठोडा परिसरात नंदग्राम