नागपूर मेडिकल : पाच डॉक्टरांना लागली प्राध्यापकाची ‘लॉटरी’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2019 01:18 AM2019-02-23T01:18:57+5:302019-02-23T01:19:37+5:30
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) शुक्रवारचा दिवस महत्त्वाचा ठरला. एकाचवेळी पाच सहयोगी प्राध्यापकांना प्राध्यापकाची ‘लॉटरी’ लागली. प्राध्यापक म्हणून पदोन्नतीचे पत्र धडकताच महाविद्यालयात उत्साहाचे वातावरण होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) शुक्रवारचा दिवस महत्त्वाचा ठरला. एकाचवेळी पाच सहयोगी प्राध्यापकांना प्राध्यापकाची ‘लॉटरी’ लागली. प्राध्यापक म्हणून पदोन्नतीचे पत्र धडकताच महाविद्यालयात उत्साहाचे वातावरण होते.
औषधवैद्यकशास्त्र विभागाचे डॉ. राजेश गोसावी, रेडिओथेरपी विभागाचे डॉ. अशोक दिवाण, पॅथालॉजी विभागाच्या डॉ. कमाल मेहरबानू, रेडिओलॉजी विभागाचे डॉ. प्रज्वलित गौर व मायक्रोबायलॉजी विभागाच्या डॉ. वंदना अग्रवाल यांना प्राध्यापक म्हणून पदोन्नती मिळाली आहे.
मेडिकलच्या औषधवैद्यकशास्त्र विभागात (मेडिसीन) प्राध्यापकाची एक जागा रिक्त, एक सहयोगी प्राध्यापकाची बदली तर एका सहयोगी प्राध्यापकाच्या स्वेच्छानिवृत्तीमुळे पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे १४ विद्यार्थी मार्गदर्शक (गाईड) अभावी अडचणीत आले होते. यावर उपाय म्हणून मेडिकल प्रशासनाने सहयोगी प्राध्यापकांना शैक्षणिक पदोन्नती (अकॅडमिक प्रमोशन) देण्याचा प्रस्ताव वैद्यकीय सचिवांकडे पाठविला होता. परंतु शैक्षणिक पदोन्नती न देता या विभागातील सहयोगी प्राध्यापक डॉ. राजेश गोसावी यांना प्राध्यापकपदी नियुक्तीचे आज पत्र धडकले. आता त्यांच्या जागेवर आणखी एक सहयोगी प्राध्यापक मिळणार असल्याने गाईडचा प्रश्न कायम स्वरूपात निकाली निघणार आहे. रेडिओथेरपी विभागातही डॉ. कृष्णा कांबळे हे सेवानिवृत्त झाल्यानंतर प्राध्यापकाचे पद रिक्त होते. सहयोगी प्राध्यापक म्हणून या विभागाचे काम पाहत असलेले डॉ. अशोक दिवाण यांची प्राध्यापकपदी पदोन्नती करण्यात आली, परंतु सोबतच त्यांची बदली करण्यात आल्याने हा विभाग अडचणीत आला आहे. रेडिओलॉजी विभागाचे प्रमुख डॉ. किशोर टावरी यांच्या मृत्यूनंतर प्राध्यापक पद रिक्त होते. सहयोगी प्राध्यापक डॉ. प्रज्वलित गौर यांना आता पदोन्नती देण्यात आल्याने बऱ्याच वर्षापासून रिक्त असलेले पद भरले. पॅथालॉजी विभागातही रिक्त असलेल्या प्राध्यापकाचा पदी डॉ. कमाल मेहरबानू तर मायक्रोबायलॉजी विभागाच्या रिक्त असलेल्या प्राध्यापक पदावर डॉ. वंदना अग्रवाल यांची वर्णी लागली आहे. लवकरच इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेयो) प्राध्यापकाचीही रिक्त पदे भरण्यात येणार असल्याची माहिती आहे.