नागपूर मेडिकलच्या अमृतमहोत्सवाचे राष्ट्रपतींच्या हस्ते १ डिसेंबरला उद्घाटन
By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2023 11:43 AM2023-09-13T11:43:54+5:302023-09-13T11:47:35+5:30
अधिष्ठाता डॉ. गजभिये : विकासासाठी ५१४ कोटींच्या निधीला मंजुरी
नागपूर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाने (मेडिकल) ७५ वर्षे पूर्ण केल्याच्या निमित्ताने दि. १ डिसेंबर २०२३ रोजी होऊ घातलेल्या अमृतमहोत्सवाचे उद्घाटन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते होणार आहे. या महोत्सवाची सांगता दि. २२ व २३ डिसेंबर २०२३ रोजी होइल, अशी माहिती मेडिकलचे अधिष्ठाता व अमृतमहोत्सवाच्या आयोजन समितीचे अध्यक्ष डॉ. राज गजभिये यांनी मंगळवारी पत्रपरिषदेत दिली.
पत्रपरिषदेला आयोजन समितीच सचिव डॉ. सुधीर नेरळ, उपअधिष्ठाता डॉ. उदय नारलावार, उपअधिष्ठाता डॉ. देवेंद्र माहोरे, डॉ. विंकी रुघवानी, डॉ. अविनाश रोडे, डॉ. अर्चना देशपांडे व डॉ. अविनाश गावंडे उपस्थित होते. डॉ. गजभिये म्हणाले, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल) ही मध्यभारतातील नावाजलेली वैद्यकीय शिक्षण संस्था आहे. या संस्थेची स्थापना १९४७ साली स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्या हस्ते झाले होते. तर मेडिकलशी संलग्न असलेल्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे उद्घाटन तत्कालीन राष्ट्रपती डॉ. शंकरदयाल शर्मा यांच्या हस्ते १९९५ साली झाले होते.
होऊ घातलेल्या अमृतमहोत्सवाचे स्वागताध्यक्षपद उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वीकारले आहे. त्यांच्या नेतृत्वात हा सोहळा होणार आहे. २३ दिवस चालणाऱ्या या महोत्सवात विविध परिसंवाद, व्याख्यान, चर्चासत्र व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाणार आहे. या महोत्सवाला देशभरातून व देशाच्या बाहेरूनही अडीच हजारांहून अधिक डॉक्टर सहभागी होण्याची शक्यता आहे.
- मेडिकलचा १७ विद्यार्थ्यांना पद्मश्री, पद्मभूषण
डॉ. गजभिये म्हणाले, मेडिकलचा १७ माजी विद्यार्थ्यांना पद्मभूषण आणि पद्मश्री मिळाले आहेत. १८ आयएएस व आयपीएस अधिकारी आहेत. ७ जणांना डॉ. बी. सी. रॉय पुरस्कार मिळाला आहे. दोन रोमन मॅगेसेस पुरस्कार प्राप्त आहे. आठ मंत्री, आमदार व खासदार, तर ५५ भारतीय सशस्त्र दलात उच्च पदस्थ अधिकारी म्हणून सेवा दिली आहे तर काही देत आहेत.
- ५१४ कोटींचा निधी
अमृतमहोत्सवाच्या निमित्ताने सरकारने मेडिकलला ५१४ कोटींचा निधी उपलब्ध करून दिला आहे. यात कॅन्सर हॉस्पिटलपासून ते इतरही विविध विकासात्मक कामे होऊ घातली आहेत. एका प्रश्नाच्या उत्तरात डॉ. गजभिये म्हणाले, अमृतमहोत्सवाच्या निमित्ताने ‘कन्व्हेन्शन सेंटर’ उभारण्याचा प्रयत्न आहे. त्याचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे.
- सचिन तेंडुलकर यांनाही दिले निमंत्रण
भारतीय क्रिकेट संघाचा माजी दिग्गज खेळाडू सचिन तेंडुलकर यांनाही अमृतमहोत्सवात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहण्याचे निमंत्रण देण्यात आले आहे. त्यांच्याकडून अद्याप उत्तर आलेले नाही. हा महोत्सव एक अविस्मरणीय पर्वणीच ठरणार असल्याचेही डॉ. गजभिये म्हणाले. पत्रपरिषदेला मेडिकल व सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे सर्व विभागप्रमुख व अधिकारी उपस्थित होते.