नागपूर वैद्यकीय महाविद्यालयात ‘एमसीएच’ पेडियाट्रिक सर्जरीला अखेर मंजुरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2019 10:24 AM2019-05-15T10:24:43+5:302019-05-15T10:40:13+5:30
मेडिकलमधील ‘एमसीएच’ पेडियाट्रिक सर्जरी’ला अखेर ‘एमसीआय’ने दोन जागांना मंजुरी दिली. यामुळे आता या अभ्यासक्रमाचा मार्ग मोकळा झाला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मेडिकलमधील ‘एमसीएच’ पेडियाट्रिक सर्जरी’ला अखेर ‘एमसीआय’ने दोन जागांना मंजुरी दिली. यामुळे आता या अभ्यासक्रमाचा मार्ग मोकळा झाला आहे. महाराष्ट्रात जे.जे. हॉस्पिटल मुंबई, नंतर नागपूर मेडिकलमध्ये हा अभ्यासक्रम सुरू होत आहे. विशेष म्हणजे, मेडिकलच्या ‘एमसीएच प्लास्टिक सर्जरी’ अभ्यासक्रमानंतर हा दुसरा अभ्यासक्रम असणार आहे.
मेडिकलमध्ये येणाऱ्या रुग्णांमध्ये बालरोग रुग्णांची संख्याही सर्वाधिक असते. बाह्यरुग्ण विभागात रोज ३०० वर बालरुग्ण असतात. यातील ३० ते ४० टक्के रुग्ण हे शल्यक्रियेचे असतात. आतापर्यंत या शस्त्रक्रिया मेडिकलच्या जनरल सर्जरी विभागाकडून केल्या जायच्या. काही महत्त्वाच्या शस्त्रक्रियेसाठी दिल्ली किंवा मुंबईला पाठविले जायचे. याची दखल तत्कालीन अधिष्ठाता व बालरोग विभागाचे प्रमुख डॉ. अभिमन्यू निसवाडे यांनी घेतली. त्यांनी ‘एमसीएच पेडियाट्रिक सर्जरी’चा प्रस्ताव नाशीक येथील महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाकडे मंजुरीसाठी पाठविला. मंजुरी प्राप्त होताच या विभागासाठी प्राध्यापक म्हणून डॉ. नीलेश नागदिवे, सहयोगी प्राध्यापक म्हणून डॉ. राजेंद्र सावजी व सहायक प्राध्यापक म्हणून डॉ. चारू शर्मा यांची पदभरती केली. २००६ पासून हा स्वतंत्र विभाग सुरू झाला. याच दरम्यान बालरोग विभागाच्या ‘वॉर्ड क्र. आठ’ ला ‘पेडियाट्रिक सर्जरी’ वॉर्डात रुपांतरित करण्यात आले. तेव्हापासून ‘एमसीएच’ अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू झाले. गेल्याच महिन्यात ‘एमसीआय’च्या चमूकडून पाहणी झाली. अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा यांनी स्वत:हून यात पुढाकार घेतला होता. अखेर १३ मे रोजी ‘एमसीआय’कडून दोन जागेला मंजुरी देत असल्याचा ई-मेल मेडिकल प्रशासनाला प्राप्त झाला. तब्बल १३ वर्षानंतर सर्वांच्या प्रयत्नाला यश आले. यामुळे आता आजूबाजूच्या राज्यातून येणाऱ्या चिमुकल्यांना आणखी अद्ययावत उपचार मिळून त्यांचा जीव वाचणार आहे.
मेडिकलच्या पेडियाट्रिक सर्जरी विभागाने २००६ पासून ते आतापर्यंत सुमारे सात हजार बालकांवर अत्यंत गुंतागुतीच्या शस्त्रक्रिया केल्या. यातील बहुसंख्य शस्त्रक्रिया यशस्वी झाल्या. यामुळे गेल्या सात वर्षांत रुग्णांची संख्या दुपटीने वाढल्याचे या विभागाचे प्रमुख डॉ. नीलेश नागदिवे यांनी सांगितले.
राज्यात केवळ ‘पेडियाट्रिक सर्जरी’ नागपुरात
राज्यात सर्वात आधी जे.जे. हॉस्पिटल मुंबई येथे या अभ्यासक्रमाला मंजुरी मिळाली. परंतु गेल्या तीन वर्षांपासून विभागाला ‘फॅकल्टी’ मिळाली नाही. परिणामी, हा विभाग बंद पडला आहे. यामुळे राज्यात आता केवळ नागपुरात हा विभाग सुरू आहे.
‘एमसीएच प्लास्टिक सर्जरी’ अभ्यासक्रम सुरू होणारे नागपुरातील मेडिकल हे पहिले महाविद्यालय होते. त्यानंतर आता ‘एमसीएच पेडियाट्रिक सर्जरी’ अभ्यासक्रम सुरू होत आहे. ‘एमसीआय’च्या निकषानुसार पायाभूत सोयी उपलब्ध करून देण्यात आल्याने १३ वर्षांच्या प्रयत्नांना यश आले आहे. या अभ्यासक्रमाला दोन जागा मिळाल्याने विद्यार्थ्यांना याचा फायदा होईल, सोबतच बालकांना अद्यायावत उपचारही मिळतील.
-डॉ. सजल मित्रा
अधिष्ठाता, मेडिकल