नागपूर मेडिकल कॉलेज इस्पितळात काळी रिबीन बांधून रुग्णसेवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2018 01:18 AM2018-12-25T01:18:49+5:302018-12-25T01:20:18+5:30
गेल्या तीन महिन्यांपासून विद्यावेतनाच्या प्रतीक्षेत असलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (मेडिकल) निवासी डॉक्टरांनी याविरोधात सोमवारी काळ्या रिबीन बांधून रुग्णसेवा दिली. विशेष म्हणजे, शस्त्रक्रियागृहातही निवासी डॉक्टरांनी हे आंदोलन कायम ठेवले. सायंकाळी एकत्रित झालेल्या निवासी डॉक्टरांसमोर मेडिकल मार्डचे अध्यक्ष डॉ. आशुतोष जाधव यांनी पुढील आंदोलनाची रूपरेषा मांडली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : गेल्या तीन महिन्यांपासून विद्यावेतनाच्या प्रतीक्षेत असलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (मेडिकल) निवासी डॉक्टरांनी याविरोधात सोमवारी काळ्या रिबीन बांधून रुग्णसेवा दिली. विशेष म्हणजे, शस्त्रक्रियागृहातही निवासी डॉक्टरांनी हे आंदोलन कायम ठेवले. सायंकाळी एकत्रित झालेल्या निवासी डॉक्टरांसमोर मेडिकल मार्डचे अध्यक्ष डॉ. आशुतोष जाधव यांनी पुढील आंदोलनाची रूपरेषा मांडली.
मेडिकलमध्ये ६०० निवासी डॉक्टर तर १५० वरिष्ठ निवासी डॉक्टर कार्यरत आहेत. निवासी डॉक्टरांना दरमहा ५४ हजार रुपये विद्यावेतन दिले जाते. महिन्याकाठी दोन कोटी ४० लाख रुपये यावर खर्च होतो. वैद्यकीय शिक्षण विभागाकडून हा निधी उपलब्ध होतो. परंतु आॅक्टोबर महिन्यापासून हा निधीच मिळाला नाही. याविरोधात निवासी डॉक्टरांची संघटना ‘मार्ड’ने सोमवारपासून आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. आज सर्व निवासी डॉक्टरांनी दंडाला काळ्या रिबीन बांधून रुग्णसेवा दिली. ज्या निवासी डॉक्टरांची शस्त्रक्रियागृहात ड्युटी होती त्यांनीही काळ्या रिबीन बांधल्या होत्या. सायंकाळी निवासी डॉक्टरांची बैठक घेऊन मार्ड अध्यक्ष डॉ. जाधव यांनी पुढील आंदोलनाची रूपरेषा मांडली. यात गुरुवारी रॅली काढून शासनाचे लक्ष वेधले जाणार आहे. या आठवड्यात विद्यावेतनाचा प्रश्न न सुटल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशाराही मार्डने दिला आहे.
स्थानिकस्तरावरून देण्यात येणाऱ्या विद्यावेतनावर आक्षेप
प्राप्त माहितीनुसार, वैद्यकीय शिक्षण विभागाकडून विद्यावेतनाचा निधी उपलब्ध न झाल्याने गेल्या महिन्यात अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे यांनी जिल्हाधिकाºयांच्या परवानगीने स्थानिकस्तरावरून विद्यावेतनाची समस्या सोडविली होती. परंतु या महिन्यात कोषागार विभागाने स्थानिकस्तरावरून विद्यावेतन देता येत नसल्याचा नियम समोर केल्याने अडचणी वाढल्या आहेत. सध्या विद्यावेतनाची फाईल वित्त विभागात पडून असल्याची माहिती आहे.
निवासी डॉक्टरांचा हा छळ
निवासी डॉक्टर २४ तास रुग्णसेवेत असतात. यामुळे त्याला वेळेत विद्यावेतन मिळावे, ही शासनाची जबाबदारी आहे. परंतु याकडे नेहमीच दुर्लक्ष झाले आहे. विद्यावेतनाबाबत यापूर्वीही संप व आंदोलने झाली, मात्र आजही निवासी डॉक्टरांचा छळ थांबलेला नाही. शासनाचे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन तीव्र केले जाईल.
डॉ. आशुतोष जाधव
अध्यक्ष, मेडिकल मार्ड