नागपूर मेडिकल कॉलेज इस्पितळ : अखेर ब्रॅकेथेरपी यंत्राच्या सोर्सला मिळाला निधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2019 01:21 AM2019-01-08T01:21:34+5:302019-01-08T01:24:50+5:30
शरीराच्या अंतर्गत भागात रेडिएशन देण्यासाठी उपयुक्त ‘ब्रॅकेथेरपी’ यंत्राचा ‘सोर्स’ विकत घेण्यासाठी महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेचा निधी खर्च करण्यास सोमवारी शासनाने मंजुरी दिल्याने कर्करोगाच्या रुग्णांना दिलासा मिळाला आहे. विशेष म्हणजे, हे यंत्र ५ डिसेंबरपासून बंद होते. संबंधित विभागाने यंत्र बंद पडण्यापूर्वीच, आॅगस्ट महिन्यात ‘सोर्स’ विकत घेण्याचा प्रस्ताव पाठविला होता. मात्र आता निधीला मंजुरी मिळाली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शरीराच्या अंतर्गत भागात रेडिएशन देण्यासाठी उपयुक्त ‘ब्रॅकेथेरपी’ यंत्राचा ‘सोर्स’ विकत घेण्यासाठी महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेचा निधी खर्च करण्यास सोमवारी शासनाने मंजुरी दिल्याने कर्करोगाच्या रुग्णांना दिलासा मिळाला आहे. विशेष म्हणजे, हे यंत्र ५ डिसेंबरपासून बंद होते. संबंधित विभागाने यंत्र बंद पडण्यापूर्वीच, आॅगस्ट महिन्यात ‘सोर्स’ विकत घेण्याचा प्रस्ताव पाठविला होता. मात्र आता निधीला मंजुरी मिळाली.
भारतात इतर राज्याच्या तुलनेत कर्करोगाच्या अकाली मृत्यूमध्ये महाराष्ट्राचा तिसरा क्रमांक लागतो. यात ‘हेड अॅण्ड नेक कॅन्सर’मध्ये विदर्भ ‘राजधानी’ ठरत आहे. नागपुरात इतर कर्करोगाच्या तुलनेत डोक्याचा आणि मानेच्या कर्करोगाचे २२.७ टक्के रुग्ण आहेत. कर्करोगाचे जे रुग्ण उपचारासाठी येतात त्यात तिसऱ्या व चौथ्या टप्प्यातील रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. यातील बहुसंख्य रुग्ण हे दारिद्र्य रेषेखालील किंवा दारिद्र्य रेषेवरील असतात. यामुळे या रुग्णांसाठी मेडिकलचा कर्करोग विभाग आशेचा किरण ठरले आहे. मात्र, विभागाच्या विकासाला शासनाचा उदासीनपणा नडला आहे. आजही कालबाह्य झालेल्या कोबाल्टवर व ‘ब्रॅकेथेरपी’ यंत्रावर रुग्ण अवलंबून आहेत. ‘ब्रॅकेथेरपी’ यंत्राचा ‘सोर्स’ संपल्याने ५ डिसेंबरपासून हे यंत्र बंद पडले होते. हे उपकरण बंद पडण्यापूर्वी आॅगस्ट महिन्यात नवा ‘सोर्स’ विकत घेण्याचा प्रस्ताव विभागाकडून पाठविण्यात आला होता. परंतु चार महिन्यानंतर आता नऊ लाख १५ हजार ८०० रुपयांच्या निधीतून ‘सोर्स’ खरेदी करण्यास मंजुरी मिळाली. महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेतील निधीतून हा खर्च करण्याचे आदेश देण्यात आले आहे. यामुळे लवकरच रुग्णसेवेत हे यंत्र सुरू होण्याची शक्यता आहे. मात्र, यंत्र बंद पडण्यापूर्वीच खरेदीला मंजुरी मिळाली असती तर कर्करोग रुग्ण अडचणीत आले नसते, अशीही चर्चा आहे.
कॅन्सर इन्स्टिट्यूटची प्रतीक्षा कधी संपणार
मेडिकलमध्ये कॅन्सर इन्स्टिट्यूट उभारण्याची घोषणा तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी २०१२ च्या हिवाळी अधिवेशनात केली होती. परंतु तेव्हापासून हे इन्स्टिट्यूट कागदावरच आहे. इन्स्टिट्यूट स्थापनेबाबत दाखल जनहित याचिकेवर जून २०१७ मध्ये न्यायालयाने दोन वर्षात कॅन्सर इन्स्टिट्यूट उभारावे, असे निर्देश दिले होते. परंतु आता दीड वर्षापेक्षा जास्त कालावधी झाला आहे. परंतु इन्स्टिट्यूटच्या बांधकामाला सुरुवातही झाली नाही.