नागपूर मेडिकल इस्पितळ : मार्चपर्यंत ५८ कोटींच्या यंत्रसामुग्रीची खरेदी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2019 12:24 AM2019-01-11T00:24:19+5:302019-01-11T00:25:42+5:30
मेडिकलमधील तीन महत्त्वपूर्ण विभागाच्या अत्याधुनिक अतिदक्षता विभागासाठी (आयसीयू) व ट्रॉमा केअर सेंटरच्या यंत्रसामुग्रीसाठी ५८ कोटी रुपयांना मंजुरी मिळाली. मात्र, मार्च २०१९ पर्यंत ही खरेदी प्रक्रिया पूर्ण करण्याची अट असल्याने अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे व विभागप्रमुख डॉ. राज गजभिये यांनी मुंबई गाठली. हाफकिन कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालक संपदा मेहता यांची भेट घेतली. याचे फलित म्हणून मार्चपर्यंत ही खरेदी प्रक्रिया पूर्ण करण्याचे नुकतेच हमीपत्र मेडिकलला मिळाले. यामुळे लवकरच ‘आयसीयू’सह ‘ट्रॉमा’मधील यंत्रसामुग्रीचा प्रश्न निकाली निघण्याची शक्यता आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मेडिकलमधील तीन महत्त्वपूर्ण विभागाच्या अत्याधुनिक अतिदक्षता विभागासाठी (आयसीयू) व ट्रॉमा केअर सेंटरच्या यंत्रसामुग्रीसाठी ५८ कोटी रुपयांना मंजुरी मिळाली. मात्र, मार्च २०१९ पर्यंत ही खरेदी प्रक्रिया पूर्ण करण्याची अट असल्याने अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे व विभागप्रमुख डॉ. राज गजभिये यांनी मुंबई गाठली. हाफकिन कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालक संपदा मेहता यांची भेट घेतली. याचे फलित म्हणून मार्चपर्यंत ही खरेदी प्रक्रिया पूर्ण करण्याचे नुकतेच हमीपत्र मेडिकलला मिळाले. यामुळे लवकरच ‘आयसीयू’सह ‘ट्रॉमा’मधील यंत्रसामुग्रीचा प्रश्न निकाली निघण्याची शक्यता आहे.
मेडिकलमध्ये केवळ औषधवैद्यकशास्त्र विभागाचे २० खाटांचे ‘आयसीयू’ आहे. याच ‘आयसीयू’मध्ये इतरही विभागाचे गंभीर रुग्णही ठेवले जातात. यामुळे हा विभाग नेहमीच फुल्ल असतो. याची दखल अधिष्ठाता डॉ. निसवाडे यांनी घेतली. पंतप्रधान आरोग्य सुरक्षा योजनेच्या निधीतून ‘सर्जिकल इन्टेन्सिव्ह केअर युनिट’, ‘मेडिसीन इन्टेन्सिव्ह केअर युनिट’ आणि ‘पेडियाट्रिक इन्टेन्सिव्ह केअर युनिट’चे बांधकाम हाती घेतले. प्रत्येक ‘युनिट’मध्ये २० प्रमाणे एकूण ६० खाटांची सोय केली. दोन वर्षात याचे बांधकाम पूर्णही झाले. परंतु आता प्रतीक्षा होती यंत्रसामुग्रीची. यासाठी दोन महिन्यांपूर्वी ५४ कोटी ३८ लाख ९८ हजार रुपयांच्या निधीला तर ट्रॉमा केअर सेंटरमधील यंत्रसामुग्रीसाठी तीन कोटी ३८ लाखांची मंजुरी दिली. हा निधी यंत्रसामुग्रीच्या खरेदीचे अधिकार असलेल्या ‘हाफकिन’ कंपनीकडे वळताही केला. ३१ मार्च २०१९ पूर्वी खरेदी प्रक्रिया पूर्ण होणे आवश्यक होते. परंतु डिसेंबर महिना उजळूनही खरेदी प्रक्रियेला सुरुवात झाली नव्हती. याबाबत मेडिकल प्रशासनाने ‘हाफकिन’ कंपनीला पत्र दिले. स्वत: अधिष्ठाता डॉ. निसवाडे व शल्यचिकित्सा विभागाचे प्रमुख डॉ. राज गजभिये यांनी मुंबई गाठून हाफकिन कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालक संपदा मेहता यांना भेटले. या
पुढाकारामुळे कंपनीने मुदतीपूर्व सुमारे ५८ कोटी रुपयांची खरेदी करण्याचे हमीपत्र मेडिकल प्रशासनाला दिले. याला डॉ. निसवाडे यांनी दुजोराही दिला आहे.