नागपूर मेडिकलमध्ये २००वर महिलांची कर्करोग तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2018 11:07 PM2018-03-08T23:07:28+5:302018-03-08T23:07:43+5:30
जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाने (मेडिकल) २००वर महिलांची मोफत कर्करोग तपासणी केली, सोबतच या रोगासंदर्भात विविध माहिती देऊन जनजागृती केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाने (मेडिकल) २००वर महिलांची मोफत कर्करोग तपासणी केली, सोबतच या रोगासंदर्भात विविध माहिती देऊन जनजागृती केली. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे उपस्थित होते.
वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांच्या संकल्पनेनुसार या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाला डॉ. वृंदा सहस्त्रभोजने, डॉ. योगेंद्र बन्साडे, डॉ. राज गजभिये, डॉ. कृष्णा कांबळे, डॉ. उदय नारलवार, डॉ. फिदवी, डॉ. अविनाश गावंडे, डॉ. फुलपाटील, डॉ. राजेश गोसावाी, डॉ. अशोक दिवाण, मुख्य प्रशासकीय अधिकारी परशुराम दोरवे आदी उपस्थित होते. या कार्यक्रमांतर्गत सहभागी झालेल्या महिलांची मॅमोग्राफी, पॅपस्मेअर, बोन डेन्सिटी सारख्या तपासण्या मोफत करण्यात आल्या. संचालन डॉ. प्रगती राठेड यांनी तर आभार डॉ. अविनाश गावंडे यांनी मानले. यावेळी कर्करोग तज्ज्ञ डॉ. कृष्णा कांबळे व डॉ. अशोक दिवाण यांनी महिलांच्या कर्करोगावर मार्गदर्शन केले.
ब्रेस्ट कॅन्सरमध्ये अद्यावत शस्त्रक्रियेची भर -डॉ. निसवाडे
डॉ. अभिमन्यू निसवाडे म्हणाले, पूर्वी कॅन्सरच्या प्राथमिक अवस्थेत निदान झाल्यावर तो बरा होण्याचे प्रमाण केवळ २० टक्के होते. पण आता ते तब्बल ८० टक्क्यांपर्यंत वाढले आहे. रुग्णामध्ये गाठ असलेले पूर्ण स्तन काढण्याची शस्त्रक्रिया केली जायची परंतु आता मेडिकलमध्ये अद्यावत शस्त्रक्रियेद्वारे स्तनातील गाठ काढण्याचा पर्याय अवलंबला जाणार आहे. मेडिकलच्या कॅन्सर इन्स्टिट्यूटच्या बांधकामाला लवकरच सुरुवात होईल, असेही ते म्हणाले.
तीन महिलांना मुख कर्करोग : शासकीय दंत रुग्णालय
जागतिक महिला दिनाच्यानिमित्ताने शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयाने ११२ महिलांची मुख कर्करोगाची नि:शुल्क तपासणी करण्यात आली. यात तीन महिलांना मुख कर्करोग असल्याचे निदान झाले, तर १२ महिलांना मुख पूर्वकर्करोग असल्याचे आढळून आले. ही तपासणी रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. सिंधू गणवीर यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली.
रुग्णालयाच्या सामाजिक दंतशास्त्र विभागाच्यवतीने आयोजित महिला दिनाच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून डॉ. शैलेजा देशपांडे, अर्चना दास उपस्थित होत्या. यावेळी मुख कर्करोगावर डॉ. देशपांडे, डॉ. सिंधू गणवीर व दास यांनी मार्गदर्शन केले. डॉ. गणवीर यांनी ११२ रुग्णांमधून तिघांना कर्करोग व १२ मुख पूर्वकर्करोगाचे रुग्ण आढळून आल्याने आश्चर्य व्यक्त केले. या रोगाबाबत घराघरातून जनजागृती होणे आवश्यक असल्याचेही त्या म्हणाल्या. उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल आभा चव्हाण, ज्योती पंडागळे, सीमा सांडे या महिलांचा सत्कार करण्यात आला. यावेळी विविध स्पर्धा व मनोरंजनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. रडके, डॉ. कळमकर, डॉ. शुभा व डॉ. ज्योती वानखेडे यांनी सहकार्य केले.