नागपुरात पारा घसरला, थंडी वाढली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2020 11:51 PM2020-01-10T23:51:48+5:302020-01-10T23:52:37+5:30
आकाश दाटून आलेले ढग निघून गेल्याने वातावरण कोरडे झाले. परिणामी नागपुरातील पारा घसरला असून कडाक्याची थंडी वाढली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : आकाश दाटून आलेले ढग निघून गेल्याने वातावरण कोरडे झाले. परिणामी नागपुरातील पारा घसरला असून कडाक्याची थंडी वाढली आहे. नागपुरातील किमान तापमान सरासरीपेक्षा तीन अंशाने घसरून १०.१ अंश सेल्सिअसवर आले आहे. गेल्या २४ तासात रात्रीचे तापमान ५.८ अंशाने खाली घसरले आहे तर दिवसाच्या तापमनातही ३ अंशाने घट झाली आहे. दिवसाचे तापमान २५.३ अंशावर आले आहे. यामुळे दिवसाही बोचरी थंडी जाणवत आहे.
हवेची दिशा पूर्व-उत्तर पूर्व असल्याने आणि आर्द्रता ५४ ते ६८ टक्केवर गेल्यामुळे हवेत थंडावा आहे. हवेची गती सुद्धा ५.४ किमी प्रति तास कायम आहे. यामुळे थंड हवा नागपूरकरांना त्रासदायक ठरत आहे. येणाऱ्या दिवसातही असेच वातावरण राहण्याची शक्यता हवामान विभागाने दर्शविली आहे.