नागपुरात पारा पोहचला ४४.२ अंशावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2020 11:06 PM2020-05-20T23:06:35+5:302020-05-20T23:09:11+5:30
विदर्भातील वातावरणावर अद्याप ‘अम्फान’चा परिणाम पडल्याची कोणतीही चिन्हे नाहीत. याचदरम्यान बुधवारी वातावरण कोरडे असल्याने विदर्भातील अनेक जिल्ह्यांतील तापमान वाढलेले होते. बुधवारी नागपूरचे तापमान ४४.२ अंश होते. तर अकोलाचे तापमान विदर्भातून सर्वात जास्त म्हणजे ४४.७ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : विदर्भातील वातावरणावर अद्याप ‘अम्फान’चा परिणाम पडल्याची कोणतीही चिन्हे नाहीत. याचदरम्यान बुधवारी वातावरण कोरडे असल्याने विदर्भातील अनेक जिल्ह्यांतील तापमान वाढलेले होते. बुधवारी नागपूरचेतापमान ४४.२ अंश होते. तर अकोलाचे तापमान विदर्भातून सर्वात जास्त म्हणजे ४४.७ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले.
नागपुरातील तापमानामध्ये मागील २४ तासांमध्ये २ अंशाने वाढ नोंदविण्यात आली आहे. येथील आर्द्रता सकाळी ४४ टक्के होती. त्यात घट होऊन सायंकाळी ३४ टक्क्यांवर घसरली. असे असले तरी रात्रीच्या तापमानात सामान्यापेक्षा ५ अंशाची घट होऊन तापमान २३.१ अंशावर आले. त्यामुळे नागरिकांना बराच दिलासा मिळाला.
साधारणत: मे महिना विदर्भात बराच तापतो. मात्र या वर्षी विदर्भात दरवर्षीपेक्षा उष्णतामान तापले नाही. पारा ४५ च्या जवळपास पोहचतो आणि पुन्हा वातावरणात बदल घडल्याने घसरत असल्याचा अनुभव येत आहे.
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, अम्फान चक्रीवादळाचा परिणाम विदर्भ, तसेच मराठवाड्यावर पडण्याची शक्यता कमी आहे. या काळात वातावरण कोरडे होईल. आकाशात कमीअधिक प्रमाणात ढग दिसतील. मात्र त्याचा तापमानावर फारसा परिणाम पडणार नाही.
विदर्भात बुधवारी यवतमाळमध्ये ४३.५, अमरावतीमध्ये ४३.४, गोंदियात ४३.२, वर्ध्यामध्ये ४३.१, चंद्रपुरात ४३, ब्रह्मपुरीमध्ये ४१.७, गडचिरोलीत ४१.६ व बुलडाण्यामध्ये ४०.६ अंश सेल्सियस तापमानाची नोंद घेण्यात आली.