नागपूर मेट्रो: धूळ, खड्डे अन् वाहतुकीची कोंडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2017 11:07 AM2017-11-23T11:07:52+5:302017-11-23T11:16:38+5:30
विकासाच्या नावावर पूर्व नागपूरचे नागरिक दु:ख सहन करण्यास तयार होते. पण समस्या मोठ्या झाल्यामुळे आता हे दु:ख सहन करण्यापलीकडे गेले आहे.
आॅनलाईन लोकमत
नागपूर : विकासाच्या नावावर पूर्व नागपूरचे नागरिक दु:ख सहन करण्यास तयार होते. पण समस्या मोठ्या झाल्यामुळे आता हे दु:ख सहन करण्यापलीकडे गेले आहे. वाहतुकीची कोंडी, धूळ-मातीचे ढिगारे, खड्डे, बॅरिकेट्मुळे एकाच मार्गावरून नागरिकांना ये-जा करावी लागत असल्यामुळे त्यांना दररोज अनेक समस्या आणि अडचणींचा सामनागत आहे. असे विकास कार्य पुन्हा होऊ नये, अशा नागरिकांच्या प्रतिक्रिया आहेत.
गेल्या अनेक वर्षांपासून पारडी उड्डाण पुलाचे बांधकाम कासव गतीने सुरू आहे. त्यामुळे स्थानिक नागरिक, व्यापारी, दुकानदार आधीच त्रस्त होते. आता याच परिसरात मेट्रो रेल्वेचे बांधकाम वेगात सुरू आहे. एचबी टाऊन चौक, पारडी ते वर्धमाननगरकडे जाणाºया रस्त्याचा एक भाग फ्लायओव्हरच्या कामामुळे बंद करण्यात आला आहे. त्यामुळे दुसºया रस्त्यावरून नागरिकांची ये-जा सुरू आहे. या मार्गावर बॅरिकेट्स लावताना वाहतुकीची कोंडी होईल, याकडे कानाडोळा केला आहे.
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणातर्फे उड्डाण पूल बांधण्यात येत आहे. पण प्राधिकरणाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. येथे पिलर उभारण्यात येत आहेत. त्यामुळे धूळ-माती हवेतून लगतच्या मार्गावर आणि दुकानात जात आहे. स्थानीय नागरिकांच्या तक्रारीकडे कुणीही लक्ष देत नाही. नागरिकांना कळमना, पारडी, वर्धमाननगर, मिनीमातानगर, भांडेवाडी या परिसरातून जीव धोक्यात टाकून जावे लागते. बांधकाम नियोजनबद्ध नसल्यामुळे गंभीर समस्या निर्माण झाली आहे.
जड वाहनांचा धोका
कळमना बाजारपेठ पूर्व नागपुरात आहे. या बाजारात दररोज १५० ते २०० जड वाहने येतात. भंडारा रोड हा रिंग रोड असल्यामुळे नागपुरातून अन्य भागांना जोडणाऱ्या सेंट्रल एव्हेन्यूमुळे या मार्गावरून दररोज हजारो लहानमोठ्या वाहनांची ये-जा आहे. सकाळी आणि सायंकाळी नेहमीच वाहनांच्या लांब रांगा असतात. पण आता मेट्रो रेल्वेच्या बांधकामामुळे ब्लॉक करण्यात आलेल्या रस्त्यामुळे समस्या आणखी वाढली आहे.
दुरुस्तीविना बंद केला मार्ग
एचबी टाऊन ते वर्धमाननगरकडे जाणाऱ्या मार्गाला फ्लायओव्हरच्या कामामुळे बंद करण्यात आले आहे. तर त्याच्या पहिल्या मार्गाच्या दुसऱ्या काही भागात (वर्धमाननगर ते एचबी टाऊनकडे) मेट्रो स्टेशनसाठी खोदकाम करण्यात आले आहे. खोदण्यात आलेल्या रस्त्याचे डांबरीकरण न करताच एचबी टाऊन, पारडी चौक मार्गाला बंद केल्यामुळे समस्या वाढली आहे.
रात्री होतात अपघात
उड्डाण पुलाच्या पिलरमुळे पारडी चौकाच्या चारही मार्गावर खोदकाम करण्यात आले आहे. या मार्गावरून विजेचे खांब हटविले आहेत. अंधारात मार्ग दिसावा म्हणून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने बॅरिकेट्स आणि रिफ्लेक्टर केवळ नावासाठी लावले आहेत. त्याचा दुचाकी वाहनचालकांना त्रास होत आहे. या मार्गावर अनेक अपघात झाले आहेत. वर्धमाननगर ते प्रजापतीनगरदरम्यान उड्डाण पुलासाठी लावण्यात आलेले बॅरिकेट्स हटविले आहेत, पण पिलरचे बांधकाम अर्धवट आहे. माती रस्त्यावर पसरली आहे. या ठिकाणी रिफ्लेक्टर नसल्यामुळे रात्री वाहनचालक थेट बांधकामस्थळी गाडी नेत आहेत.
मार्गावर खड्डेच खड्डे
वर्धमाननगर, पारडी चौक, पारडी बाजार, कळमना रोड, प्रजापतीनगर ते स्वामी नारायण मंदिरसह डझनभर मार्गाची स्थिती गंभीर आहे. पिलरच्या बांधकामामुळे या मार्गावर खड्डेच खड्डे आहेत. खड्डे समतोल करण्यासाठी त्यात माती टाकण्यात येत आहे. मंगळवारी रात्री काही ठिकाणी डांबरीकरण करण्यात आले. पण ते कामही अर्धवट आहे.
लोकप्रतिनिधींच्या डोळ्यावर पट्टी
या परिसरातील बहुतांश लोकप्रतिनिधी भाजपाचे आहेत. मनपा, राज्य व केंद्रात भाजपाची सत्ता आहे. उड्डाण पूल आणि मेट्रो रेल्वेच्या बांधकामाला विकास कामांसोबत जोडण्यात येत आहे. लोकप्रतिनिधींनी समस्या आणि अडचणीसंदर्भात नागरिकांसोबत कधीही चर्चा केलेली नाही. त्यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना कार्यप्रणालीत सुधारणा करण्याचे साधे निर्देशही दिले नाहीत. जीव धोक्यात टाकून पारडी चौकातून जावे लागते, अशा नागरिकांच्या प्रतिक्रिया आहेत. पारडी चौक अािण पारडी बाजारात रस्ते अपघातात अनेकांचा जीव गेला आहे.