मेट्रोचे प्रवासभाडे वाढले, महसूल अन् प्रवासी घटले; अधिकारी म्हणतात...
By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2023 03:01 PM2023-01-20T15:01:31+5:302023-01-20T15:05:29+5:30
प्रवासभाडे कमी असल्यामुळे बहुतांश प्रवासी मेट्रोने प्रवास करीत होते; परंतु, आता..
आशिष रॉय
नागपूर : महामेट्रोनेनागपूरमेट्रोचे प्रवासभाडे वाढविले आहे. यामुळे प्रवाशांची संख्या झपाट्याने कमी झाली आहे. यासोबतच पूर्वीच्या तुलनेत महामेट्रोचा महसूलही घटला आहे. महामेट्रोच्या अधिकाऱ्यांनी मात्र प्रवासभाडे वाढविले नसून कोरोनापूर्वी असलेले प्रवासभाडे पूर्ववत केल्याचे म्हटले आहे. कोरोनाच्या काळात प्रवासभाड्यात सूट देण्यात आली होती. ही सूट आता हटविण्यात आली आहे.
मेट्रोचे प्रवासभाडे नऊ किलोमीटरपर्यंत प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी समान आहे. यामुळे बहुतांश प्रवाशांना वाढलेल्या प्रवासभाड्याचा फटका बसलेला नाही. त्यानंतर नऊ ते १२ किलोमीटर आणि १२ ते १५ किलोमीटरपर्यंत दोन नवे टप्पे जोडण्यात आले आहेत. त्यांचे प्रवासभाडे क्रमश: १५ आणि २० रुपये आहे. १५ पेक्षा अधिक किलोमीटरपर्यंतच्या प्रवासासाठी प्रवासभाड्यात २० ते ३५ रुपयांपर्यंत वाढ करण्यात आली आहे.
पूर्वी केवळ तीन टप्पे होते. यात सहा किलोमीटरपर्यंत पाच रुपये, सहा ते १२ किलोमीटरपर्यंत १० रुपये आणि १२ पेक्षा अधिक किलोमीटरपर्यंतच्या प्रवासासाठी २० रुपये प्रवासभाडे होते. ११ डिसेंबरला नागपूर मेट्रोच्या चारही कॉरिडोरवर मेट्रो सेवा सुरू झाल्यानंतर प्रवासी संख्या झपाटाने वाढली; परंतु, त्याच्या एक महिन्यानंतर १२ जानेवारीला महामेट्रोने प्री-कोविड फेअर लागू केले. या दिवशी प्रवासी संख्या एक लाख ३६ हजार ६५६ होती. तर त्याच्या दुसऱ्याच दिवशी प्रवासीसंख्या घटून एक लाख २९ हजार ६१९ आणि १४ जानेवारीला एक लाख १९ हजार २७१ झाली. त्यामुळे दोनच दिवसांत प्रवासी संख्या १७ हजाराने कमी झाल्याचे स्पष्ट झाले आहे. याचा परिणाम मेट्रोच्या महसुलावर झाला आहे. १४ जानेवारीला महसूल १०.१२ लाख रुपये होता. हा महसूल ५ जानेवारीला १०.३१ लाख रुपये, ६ जानेवारीला १०.४८ लाख रुपये आणि ७ जानेवारीला १०.७० लाख रुपये होता.
प्रवासभाडे कमी असल्यामुळे बहुतांश प्रवासी मेट्रोने प्रवास करीत होते; परंतु, आता प्रवासभाडे वाढल्यामुळे बहुतांश नागरिकांमध्ये सुविधा आणि सुरक्षा असतानाही मेट्रोचे आकर्षण कमी होत आहे. तर ही अस्थायी परिस्थिती आहे. जेव्हा प्रवासभाडे वाढते तेव्हा काही प्रवासी कमी होतात. काळानुसार नागरिक अत्याधुनिक, सुरक्षित आणि सुविधाजनक मेट्रोच्या महत्त्वाला समजतील आणि त्यामुळे प्रवाशांची संख्या पुन्हा वाढू लागेल, असे महामेट्रोच्या सूत्रांचे म्हणणे आहे.