नागपूर मेट्रोचा प्रवासी आकडा १३ हजारांवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2021 04:07 AM2021-06-23T04:07:41+5:302021-06-23T04:07:41+5:30
- कोविड नियमांचे पालन : स्टेशन व गाड्यांची वारंवार स्वच्छता नागपूर : महा मेट्रोने प्रवाशांच्या सुरक्षेसाठी गाडी आणि स्थानकांवर ...
- कोविड नियमांचे पालन : स्टेशन व गाड्यांची वारंवार स्वच्छता
नागपूर : महा मेट्रोने प्रवाशांच्या सुरक्षेसाठी गाडी आणि स्थानकांवर घेतलेल्या कोविड सुरक्षा उपायांमुळे नागपूरकरांचा विश्वास पुन्हा एकदा कायम झाला आहे. त्यामुळे मेट्रोची राईडशिप वाढली आहे. २० जून रोजी ऑरेंज आणि अॅक्वा लाईन्सचा एकत्रित प्रवासी आकडा १३ हजारांवर गेला आहे.
लॉकडाऊन कालावधीच्या आकडेवारीच्या तुलनेत ही वाढ मोठी आहे. ५ जून रोजी ७६१ लोकांनी मेट्रोचा वापर केला होता. अनलॉक झाल्यावर पहिल्या दिवशी ७ जूनला आकडेवारी ४१५३ वर गेली. तर १३ जूनला ९५०० वर पोहोचली.
लॉकडाऊनदरम्यान दोन्ही मार्गावरील गाड्यांच्या फेऱ्या एक तास अवधीने होत्या. ७ जूनपासून ते ३० मिनिटांच्या अवधीपर्यंत वाढविण्यात आल्या. सध्या अॅक्वा लाईनवर (सीताबर्डी इंटरचेंज ते लोकमान्यनगर) सकाळी ६.३० ते सायंकाळी ८ दरम्यान आणि ऑरेंज लाईनवर (सीताबर्डी इंटरचेंज ते खापरी) सकाळी ८ सायंकाळी ८ पर्यंत गाड्या धावतात.
मेट्रो सेवा सुरू होण्यापूर्वी सर्व गाड्या व स्थानकांची स्वच्छता करण्यात आली. दिवसभर नियमित अंतराने निर्जंतुकीकरण करण्यात येते. गाड्या व स्थानकांवर अधिक स्पर्श होणाऱ्या भागांची वारंवार स्वच्छता व निर्जंतुकीकरण केले जाते. कर्मचाऱ्यांनी देऊ केलेल्या चलनी नोटा अल्ट्रा-व्हॉयलेट किरणांचा वापर करून निर्जंतुक करण्यात येतात आणि त्या स्वतंत्रपणे ठेवून प्रवाशांना देण्यासाठी उपयोग केला जातो. विविध प्राधिकरणाद्वारे जारी केलेल्या सुरक्षेसंबंधी सूचना नियमितपणे प्रवाशांपर्यंत फलकांद्वारे आणि कर्मचाऱ्यांद्वारे पोहोचविण्यात येतात. कोविडची जनजागृती स्थानकांवर आणि गाड्यांमध्ये सार्वजनिक घोषणा सिस्टीमवर नियमित घोषणा केल्या जातात. प्रवाशांच्या माहितीसाठी मेट्रो स्थानकांवर स्टँड आणि माहिती बोर्ड लावण्यात आलेले आहेत.
तारीख रायडरशिप
५ जून ७६१
७ जून४,१५३
१३ जून ९,५००
१९ जून८,६४७
२० जून१३,५००