नागपूर मेट्रो रेल्वे प्रशासनातर्फे मृताच्या पत्नीची अवहेलना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2018 01:11 AM2018-04-05T01:11:05+5:302018-04-05T01:11:18+5:30

कामठी रोडवर मेट्रो रेल्वेच्या बांधकामादरम्यान अपुऱ्या सुरक्षेमुळे अपघाती मृत्यू झालेल्या तरुणाच्या कुटुंबीयास नुकसान भरपाई देण्यास मेट्रो रेल्वेचे अधिकारी तब्बल १३ महिन्यांपासून टाळाटाळ करीत असल्याचा आरोप मृताची पत्नी किरण मेश्राम यांनी लोकमतशी बोलताना केला.

Nagpur Metro Railway administration defy deceased's wife | नागपूर मेट्रो रेल्वे प्रशासनातर्फे मृताच्या पत्नीची अवहेलना

नागपूर मेट्रो रेल्वे प्रशासनातर्फे मृताच्या पत्नीची अवहेलना

googlenewsNext
ठळक मुद्देअपघाताच्या १३ महिन्यानंतरही भरपाई देण्यास टाळाटाळ : अधिकारी करताहेत दिशाभूल

लोकमत न्यूज नेटवर्क 
नागपूर : कामठी रोडवर मेट्रो रेल्वेच्या बांधकामादरम्यान अपुऱ्या सुरक्षेमुळे अपघाती मृत्यू झालेल्या तरुणाच्या कुटुंबीयास नुकसान भरपाई देण्यास मेट्रो रेल्वेचे अधिकारी तब्बल १३ महिन्यांपासून टाळाटाळ करीत असल्याचा आरोप मृताची पत्नी किरण मेश्राम यांनी लोकमतशी बोलताना केला.
आशिष अशोकराव मेश्राम असे मृत व्यक्तीचे नाव आहे. तो एका खासगी कंपनीत कार्यरत होता. किरण मेश्राम यांनी सांगितले की, १५ फेब्रुवारी २०१७ रोजी दुपारी आशिष कामठी रोडवरून जात असताना मेट्रो रेल्वेच्या कामादरम्यान मेट्रोच्या ढिसाळ कारभारामुळे एका मोठ्या मशीनचा रॉड लागून त्यांचा घटनास्थळी मृत्यू झाला. या अपघातानंतर घटनास्थळी मेट्रो रेल्वेच्या अधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार कामगारांनी बॅरिकेट्स लावून चूक आशिषची असल्याचे भासवले. पण कंपनीच्या चुकीमुळे अपघात झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. आयटीडी सिमेंटेशन इंडिया लि. ही कंपनी त्याठिकाणी बांधकाम करीत होती. अपघातानंतर पोलिसांनी आशिषला मेयो हॉस्पिटलमध्ये आणले आणि एफआयआर नोंदविल्याची माहिती किरण यांनी दिली.
मेट्रो रेल्वेच्या निष्काळजीपणामुळे झालेल्या घटनेचा जाब विचारण्यासाठी कंपनीचे अधिकारी आनंद अग्निहोत्री यांची हिंगणा येथील कार्यालयात १७ आणि २० फेब्रुवारी २०१७ ला भेट घेतली. कोर्टकचेरीत काहीही ठेवले नाही. आपसात समझोता करा. एक महिन्यात ४० लाख रुपये नुकसान भरपाई मिळवून देण्याचे त्यांनी आश्वासन दिले. त्याकरिता त्यांनी एफआयआर व आधार कार्ड आणि अन्य कागदपत्रांचे झेरॉक्स मागितले. त्यानंतर दर दोन ते तीन दिवसांनी सिव्हील लाईन्स येथील मेट्रो हाऊसला जात होतो. अग्निहोत्री यांना मोबाईल करीत होतो. पण ते खोटी आश्वासने देत होते. त्यांनी महामेट्रोचे अधिकारी माणिक पाटील यांची भेट घालून दिली. अशा कामात वेळ लागतो. भरपाई मिळेल, चिंता करू नका, असे आश्वासन दिले. अशा प्रकारे दर महिन्यात या अधिकाऱ्यांची भेट घेत होतो, पण मला या दोन्ही अधिकाऱ्यांनी केवळ खोटी आश्वासने दिली, असा आरोप किरण मेश्राम यांनी केला.
अधिकाऱ्यांच्या खोट्या आश्वासनांना कंटाळून अखेर १७ नोव्हेंबर २०१७ ला चार ते पाच नातेवाईकांना घेऊन आयटीडी कंपनीच्या हिंगणा येथील कार्यालयात गेलो. त्यावेळी मेट्रो हाऊसमधील माणिक पाटील यांनी मला मोबाईल करून तुम्ही हिंगण्यातील कार्यालयात का गेला, यापुढे माझ्याशी संपर्क करायचा नाही, अशी तंबी देऊन जे बनते ते करून टाका, तुमचे काम होणार नाही, असे सांगितले. तेव्हा मी त्यांना आतापर्यंत आश्वासन का दिले, असे म्हटल्यानंतर मी पाच दिवसात निर्णय देतो, असे पाटील यांनी सांगितले. त्यांनी आतापर्यंत भरपाई संदर्भात काहीच केलेले नाही. आतापर्यंत आनंद अग्निहोत्री यांना १०० मोबाईल केले आहेत. आता त्यांनीही बोलण्यास नकार दिला आहे. अखेर प्रकल्प व्यवस्थापक दास यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनीही माझा या घटनेशी काहीही संबंध नाही, मला मोबाईल करू नका, असे सांगितले. ८ डिसेंबर २०१७ रोजी महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. बृजेश दीक्षित यांची भेट घेऊन त्यांना प्रकरणाची संपूर्ण माहिती दिली होती. त्यांनीही यावर आजपर्यंत काहीच निर्णय घेतलेला नाही, असे किरण मेश्राम यांनी सांगितले.
कमावता पती आशिषच्या मृत्यूनंतर दोन लहान मुले आणि वयोवृद्ध आईचा सांभाळ करीत आहे. आर्थिक स्रोत नसल्यामुळे पुढे त्यांचा सांभाळ करणे कठीण आहे. या प्रकरणी दीक्षित यांनी जातीने लक्ष घालून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी किरण मेश्राम यांनी लोकमतशी बोलताना केली.

 

Web Title: Nagpur Metro Railway administration defy deceased's wife

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.