९० किमी ताशी वेगाने धावणार नागपूरची मेट्रो
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2018 09:50 PM2018-03-15T21:50:10+5:302018-03-15T21:50:24+5:30
प्रवाशांच्या सेवेसाठी लवकरच नागपूर मेट्रोची प्रवासी वाहतूक सेवा सुरू होणार असून ताशी ९० किलोमीटर वेगाने मेट्रो ट्रेन धावणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : प्रवाशांच्या सेवेसाठी लवकरच नागपूर मेट्रोची प्रवासी वाहतूक सेवा सुरू होणार असून ताशी ९० किलोमीटर वेगाने मेट्रो ट्रेन धावणार आहे.
प्रस्तावित मेट्रो मार्गावरील स्थानकावरील कार्यदेखील अंतिम टप्प्यात आहे. त्याचीही पाहणी महामेट्रोद्वारे केली जात आहे. प्रवाशांच्या वेळेची बचत करणारी नागपूर मेट्रो आता शहरातील सर्वाधिक गती प्रदान करणारी वाहतूक सेवा ठरणार आहे. सुरुवातीला माझी मेट्रो वर्धा महामार्गावर खापरी ते साऊथ एअरपोर्टदरम्यान धावणार आहे. तेव्हा ५ किलोमीटरचा हा दैनंदिन प्रवास यात्रेकरूंना करता येणार आहे.
नागपूरकरांना ‘जॉय राईड’च्या माध्यमातून मेट्रो प्रवासाचा आनंद मिळावा, याकरिता हैदराबाद येथून रोलिंग स्टॉक नागपूरला आणण्यात आले. त्या रोलिंग स्टॉकमध्ये आवश्यक ते बदल करण्यात आले. आधुनिक सीबीटीसी सिग्नल प्रणाली बसविण्यात आली. मेट्रो जॉय रॉईड खापरी मेट्रो स्थानकापासून सुरू होऊन साऊथ एअरपोर्टपर्यंत धावेल. या दरम्यान न्यू-एअरपोर्ट मेट्रो स्थानकावर एक स्टॉप राहील. या जॉय राईडदरम्यान मेट्रो गाडीचा ताशी वेग २५ किमी इतका राहील. यातून मेट्रो प्रवाशांचा अनुभव आणि त्यांच्या गरजा लक्षात घेता महामेट्रोला भविष्यात आणखी काही उपाययोजना करता येईल. ही सेवा पुढे सीताबर्डी येथील मुंजे चौक मेट्रो स्थानकापर्यंत वाढविण्यात येणार आहे. या ठिकाणी लवकरच रुळांचे आणि सिग्नलिंग प्रणालीचे कार्य पूर्ण होताच या मार्गावर देखील प्रवासी वाहतूक सुरू होईल. मेट्रो प्रकल्पाचे काम वेगात सुरू असल्यामुळे नागपूरकरांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.