नागपुरात मेट्रो अप-डाऊनवर शुक्रवारपासून धावणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2019 08:48 PM2019-06-27T20:48:24+5:302019-06-27T20:49:26+5:30
नागपूर मेट्रोला मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्तांतर्फे (सीएमआरएस) अप मार्गावर प्रवासी सेवा सुरू करण्याचे प्रमाणपत्र मिळाल्यानंतर एका आठवड्यात महामेट्रो दर तासाला मेट्रो प्रवासी सेवा सुरूकरणार आहे. औपचारिक उद्घाटन शुक्रवार, २८ जूनला सकाळी ७.३० वाजता सीताबर्डी स्टेशनवर होणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूरमेट्रोलामेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्तांतर्फे (सीएमआरएस) अप मार्गावर प्रवासी सेवा सुरू करण्याचे प्रमाणपत्र मिळाल्यानंतर एका आठवड्यात महामेट्रो दर तासाला मेट्रो प्रवासी सेवा सुरूकरणार आहे. औपचारिक उद्घाटन शुक्रवार, २८ जूनला सकाळी ७.३० वाजता सीताबर्डी स्टेशनवर होणार आहे.
मेट्रोची पहिली फेरी सकाळी ८ वाजता सीताबर्डी इंटरचेंज स्टेशन आणि खापरी मेट्रो स्टेशनवरून सुरू होणार आहे. प्रत्येक तासावर सकाळी ८ ते सायंकाळी ७ पर्यंत मेट्रो फेऱ्या नागरिकांकरिता सुरू राहतील. तसेच सीताबर्डी स्टेशनवरून सायंकाळी ७ वाजता व खापरी स्टेशन ते सीताबर्डी स्टेशनकरिता ८.०० वाजता मेट्रोची शेवटची फेरी होईल.
सध्या सकाळी ८, ९.३० आणि ११ अशा तीन फेऱ्या तसेच दुपारी ३.३०, ५ आणि सायंकाळी ६.३० वाजता अशा तीन म्हणजे एकूण सहा मेट्रोच्या प्रवासी सेवा सुरूहोत्या. रिच-१ च्या मार्गिकेवर प्रवासी सेवेमध्ये वाढ झाल्यामुळे नागरिकांना फायदा होणार आहे. मिहान आणि हिंगणा येथील औद्योगिक वसाहतीत कार्यरत कर्मचाऱ्यांना मिहान-सेझ येथील कंपन्यांमध्ये ये-जा करणे सोयीचे होईल. मेट्रोची प्रवासी सेवा त्यांच्या कार्यालयीन वेळेनुसार कार्यरत असावी, अशी कर्मचाऱ्यांची मागणी प्रत्यक्षात उतरणार आहे.
महामेट्रो लवकरच एअरपोर्ट मेट्रो स्टेशन आणि नागपूर विमानतळदरम्यान शटल सेवा सुरू करीत आहे. त्यामुळे मेट्रो रेल्वे आणि विमानतळावरील सेवा जोडल्या जाऊन नागरिकांना सोईचे ठरणार आहे. मेट्रोच्या वाढत्या फेऱ्यामुळे नागरिक, विद्यार्थी आणि औद्योगिक वसाहतीत कार्यरत कर्मचाऱ्यांना योग्य सेवा पुरविण्याचा महामेट्रोचा प्रयत्न आहे. म्हणूनच या मार्गिकेवर प्रवासी वाढण्याची शक्यता आहे. या मार्गिकेवर राहणाऱ्या आणि नियमित प्रवास करणाऱ्या नागरिकांना मेट्रोचा फायदा होणार आहे.
मनपाच्या सहकार्याने मेट्रोने बेलतरोडी भागातून सकाळी ७.४० ते रात्री ८.३० पर्यंत बससेवा सुरू केली असून एअरपोर्ट मेट्रो स्टेशन, एअरपोर्ट साऊथ मेट्रो स्टेशन, न्यू एअरपोर्ट आणि खापरी मेट्रो स्टेशनला जोडली आहे. कर्मचाऱ्यांना कंपनी कार्यालय आणि औद्योगिक वसाहतीपर्यंत सेवा देण्यात येत आहे. मेट्रोने मल्टी मॉडेल इंटिग्रेशन (एमएमआय) अंतर्गत फीडर सेवा याआधीच सुरू केली आहे.