ताशी ९० कि.मी. वेगाने धावली ‘नागपूर मेट्रो’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2018 10:26 AM2018-10-01T10:26:42+5:302018-10-01T10:29:37+5:30
नागपूर मेट्रो रेल्वे एअरपोर्ट साऊथ ते खापरी मेट्रो स्टेशनदरम्यान पाच कि़मी. अंतर ताशी ९० कि़मी. वेगाने धावली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूर मेट्रो रेल्वे एअरपोर्ट साऊथ ते खापरी मेट्रो स्टेशनदरम्यान पाच कि़मी. अंतर ताशी ९० कि़मी. वेगाने धावली. संशोधन डिझाईन आणि स्टॅण्डर्ड आॅर्गनायझेशन (आरडीएसओ) यांच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार आणि लखनौ येथील आरडीएसओचे १२ अधिकारी व तंत्रज्ञांच्या उपस्थितीत मेट्रोचे प्रायोगिक परीक्षण (ट्रायल रन) रविवारी दुपारी यशस्वीरीत्या पार पडले. यावेळी महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. बृजेश दीक्षित आणि वरिष्ठ संचालक उपस्थित होते.
पत्रपरिषदेत दीक्षित म्हणाले, परीक्षणानंतर ताशी २५ कि.मी. वेगाने धावणारी मेट्रो आता ९० कि.मी. वेगाने धावणार आहे. गेल्या दहा दिवसांपासून ‘आरडीएसओ’चे अधिकारी नागपूर मेट्राचे ताशी ५० कि.मी., ६५ कि.मी. आणि ८० कि.मी. वेगाने आॅसिलेशन ट्रायल घेत आहेत. परीक्षादरम्यान रेल्वेच्या विविध भागात सेन्सर्स बसविले होते. यामुळे मिळणाऱ्या सर्व माहितीचे संकलन करून ‘आरडीएसओ’चे अधिकारी एक अहवाल तयार करून रेल्वे बोर्डाकडे सादर करतील. यानंतर अहवालाचा सखोल अभ्यास करून त्या आधारावर पुढील रूपरेषा आखण्यात येणार आहे. प्रवाशांना मिळणाऱ्या सुविधा, रायडरशिप इंडेक्स, आपात्कालीन ब्रेक व्यवस्था आदींची अत्याधुनिक उपकरणांची तपासणी करण्यात आली. रेल्वेच्या मानकानुसार रायडरशिप इंडेक्स ३ असायला हवा. ट्रायल रनदरम्यान २.२ होता. त्यामुळे मेट्रो ९० कि.मी. वेगाने धावण्यास सज्ज असल्याचे दीक्षित म्हणाले.
मार्च-२०१९ पर्यंत मेट्रो प्रत्यक्ष धावणार
खापरी ते मुंजे इंटरचेंज या मार्गावर मार्च-२०१९ पर्यंत मेट्रो प्रत्यक्ष धावणार असल्याचे दीक्षित यांनी सांगितले. मेट्रोचे अजनी ते सोनेगाव पोलीस ठाण्यापर्र्यंत डबलडेकर पुलाचे काम सुरू आहे. प्रथम मेट्रोच्या कामाला प्राधान्य देण्यात येत आहे. डबलडेकरचा संपूर्ण बांधकाम फंड आल्यानंतर जून-जुलै २०१९ पर्र्यंत पूर्ण होईल. या पुलाचे डिझाईन अनोखे असून बांधकामादरम्यान लोकांना त्रास होत नाही. डबलडेकर पुलाचा उपयोग मनीषनगर येथील नागरिकांना होणार आहे. मनीषनगर रेल्वे क्रॉसिंगवर लोखंडी पूल तयार करण्यात येत आहे. भूमिगत मार्गाचे काम सुरू आहे. असेच पूल विजय टॉकीज आणि गड्डीगोदाम येथे होणार आहेत. पारडी येथे पारडी स्टेशन आणि एचएचएआयच्या पुलाचे काम एकत्रितरीत्या सुरू आहे.