नागपूर मेट्रो; राजस्थानी सॅण्ड-स्टोनपासून स्टेशन निर्मिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2018 12:03 PM2018-03-21T12:03:18+5:302018-03-21T12:03:28+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूर मेट्रोच्या सर्व स्टेशनला आगळीवेगळी ओळख देण्याचा प्रयत्न महामेट्रो करीत आहे. बुद्धिस्ट आर्किटेक्टवर आधारित वर्धा रोडवरील न्यू एअरपोर्ट स्टेशनची निर्मिती राजस्थान येथील क्रीम रंगाच्या सॅण्ड स्टोनद्वारे करण्यात येत आहे. दिल्लीचे जगप्रसिद्ध कुतुबमिनार आणि इंडिया गेट तसेच न्यू-एयरपोर्ट मेट्रो स्टेशनमध्ये विलक्षण साम्य आहे, हे विशेष.
पर्यटनाच्या दृष्टीने हे स्टेशन आकर्षक ठरणार आहे. सॅण्ड-स्टोन राजस्थानच्या धोलपूर येथून सुरक्षा कवचात आणण्यात आले आहे. कोरडे आच्छादन तंत्रज्ञानाचा (ड्राय क्लॅडिंग टेक्नॉलॉजी) वापर करून सॅण्ड-स्टोन या क्षेत्रातील उत्तम कारागिरांतर्फे बसविण्यात येत आहेत.
अॅटग्रेड सेक्सनचे मुख्य प्रकल्प व्यवस्थापक एच.पी. त्रिपाठी यांनी सांगितले की, या दगडात आणि इतर दगडात नैसर्गिक रंगाचा फरक जाणवतो. इतर दगड मानवनिर्मित रंगाने आकर्षक बनविण्यात येतात. खापरी मेट्रो स्टेशनवरसुद्धा सॅण्ड-स्टोनचा वापर झाला आहे.